दक्षिणकाशी पुणतांबा तीर्थक्षेत्र विकासासाठी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी
दक्षिणकाशी पुणतांबा तीर्थक्षेत्र विकासासाठी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी
दक्षिणकाशी पुणतांबा तीर्थक्षेत्र विकासासाठी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी

Kopargaon vijay kapse दि ७ मे २०२६–कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा हे दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाते.येथील श्री योगीराज चांगदेव महाराज व कार्तिक स्वामी महाराज मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तसेच गोदावरी नदीवरील घाट पुनर्बांधणी व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा,अशी मागणी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मा. आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या मागणीपत्रात नमूद केले आहे की, अहिल्यानगर जिल्हा हा ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला जिल्हा असून येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. कोपरगाव मतदारसंघातील पुणतांबा गावाला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक येथे श्री चांगदेव महाराज समाधी, श्री कार्तिक स्वामी मंदिर तसेच गोदावरी नदीकाठी असलेल्या अहिल्यादेवी होळकर घाट, विठ्ठल घाट आणि ब्राह्मण घाट येथे दर्शनासाठी येत असतात.

सन २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून त्यासाठी लाखो भाविक राज्यभरातून येणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुणतांबा येथील तीर्थक्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याने येथे घाट पुनर्बांधणी,सहइतर मूलभूत सुविधांचा विकास तातडीने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पुणतांबा हे धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव असून येथे शेकडो वर्षांपूर्वीची अनेक पुरातन मंदिरे आहेत. या धार्मिक स्थळांचा परिसर अधिक विकसित व आकर्षक व्हावा यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच पुणतांबा येथील योगीराज चांगदेव महाराज व कार्तिकस्वामी महाराज मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास, गोदावरी नदीवरील घाट पुनर्बांधणी आणि भाविकांसाठी अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याबाबत संबंधित विभागांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.



