एकविराच्या वतीने थोरात क्रीडा संकुलात १५०० विद्यार्थ्यांचा सामूहिक योगा; मा.आ.डॉ.तांबे, सौ.दुर्गाताई तांबे यांच्यासह युवकांचा मोठा सहभाग

योगामुळे शरीर लवचिक होत असून नियमित योगासने करा – डॉ.सुधीर तांबे
योग ही भारताची जगाला देन – डॉ.जयश्री थोरात
सह्याद्री विद्यालय एकविरा फाउंडेशन व जयहिंद लोकचळवळीच्या वतीने योग दिन साजरा

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज एकविरा फाउंडेशन आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. यावेळी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ.प्रमोद राजुस्कर, डॉ. कर्पे, प्रमिला अभंग, डॉ. अनुराधा सातपुते, प्राचार्य एस. एम. खेमनर, इन्फिनिटी योगाचे प्रशिक्षक रितेश सोनवणे, योगशिक्षक सातपुते किशोर देशमुख,मिलिंद औटी,भारत शिंदे,जगन गवांदे, पर्यवेक्षक सुरेखा दिघे, एस.आर.रणशूर,अण्णासाहेब दिघे,संजय वर्पे,मिनिनाथ वर्पे आदींसह सर्व शिक्षक व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या 1500 विद्यार्थी व एकवीरा आणि जयहिंद लोकचळवळ मधील युवकांनी एकत्रित योगाचे विविध प्रकार करत योग दिन साजरा केला.
याप्रसंगी बोलताना मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरता सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुद्धा आरोग्याला जपा हा मंत्र दिला आहे. याचबरोबर स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या ही शिकवण दिली आहे.योग ही प्रत्येकाने जीवनशैली करावी. दररोज वीस मिनिटे तरी योग करा. योगासनामुळे शरीर लवचिक होत असून शरीरासाठी अत्यंत चांगला असलेला सूर्यनमस्कार हा प्रकार प्रत्येकाने जास्तीत जास्त करावा असे आवाहन त्यांनी केले.

तर डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, योग ही भारताची जगाला देण असून योगामुळे शरीर चांगले राहते. योग दिनाच्या निमित्ताने फक्त एक दिवस योग न करता स्वतःसाठी दररोज प्रत्येकाने योग करा. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. कारण चांगले आरोग्य हीच तुमची मोठी संपत्ती आहे. मन आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगा अत्यंत गरजेचे असून स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील युवक कार्यकर्ते, महिला, तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी एकवीरा फाउंडेशनच्या वतीने पौष्टिक डिंक लाडूचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.

प्रत्येकाने रोजच्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा – माजी मंत्री थोरात
योगामुळे शरीराला ऊर्जा मिळते. मन शांत व आनंदी होते. आरोग्य चांगले राहते. नियमित योगाभ्यासामुळे स्नायूंची ताकद वाढते आणि मानसिक तणाव दूर होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये योगाचा समावेश करावा. व आपले जीवन निरोगी बनवावे यासाठी अशा शुभेच्छा माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दिल्या.









