आपला जिल्हा

कर्मवीर अण्णा आणि पद्मश्री डॉ. विखेंच्या भेटीने घडली प्रवरेत शैक्षणिक क्रांती

कर्मवीर अण्णा आणि पद्मश्री डॉ. विखेंच्या भेटीने घडली प्रवरेत शैक्षणिक क्रांती

महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाने मिळाला जुन्या आठवणींना उजाळा

Loni vijay kapse दि २३ जुन २०२६- रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या भेटीतून सुरू झालेल्या शैक्षणिक क्रांतीच्या पर्वाला उजाळा मिळाला आहे. कर्मवीर अण्णा आणि पद्मश्री डॉ. विखे पाटील यांची प्रवरा परिसरातील भेट राज्याच्या सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनाला नवी दिशा देणारी होती. महात्मा गांधी विद्यालयाचा अमृत महोत्सव संपन्न होत असताना या ऐतिहासिक भेटीच्या आठवणींना मिळालेला उजाळा पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा स्मरणात राहतो; कारण प्रवरा परिसराने शैक्षणिक क्षेत्रात उभे केलेल्या कामाला सुद्धा या दोन्ही थोर विभूतींच्या भेटीचीच प्रेरणा लाभली होती.

जाहिरात

सहकार चळवळीची भूमी म्हणून प्रवरा परिसराची जडणघडण पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू झाली होती. सहकार चळवळीने आर्थिक परिवर्तनाला मोठी साथ मिळाली. कर्मवीर अण्णांनी प्रवरा परिसरात येऊन पद्मश्री विखे पाटील यांनी सहकार चळवळीची निर्माण केलेली क्रांती जवळून अनुभवली होती. सहकार चळवळीच्या निर्मितीमुळे आर्थिक परिवर्तनाचा मार्ग मिळेल, परंतु सामाजिक परिवर्तनाची लढाई यशस्वी करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, या मतावर दोन्ही विभूतींचे एकमत होते. त्यामुळेच दुर्गम भागात शिक्षणाच्या संधी निर्माण करून दिल्या तर समाज साक्षर होईल, या उद्दिष्टाने सहकार चळवळीच्या पाठबळाने शैक्षणिक चळवळ सुद्धा यशस्वी करण्याचा दृढ निश्चय कर्मवीर भाऊराव पाटील आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी केला.

जाहिरात

कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दारे खुली केली. प्रवरानगर येथे रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाची उभारणी करण्याचे ठरले तेव्हा रयतच्या या ज्ञानमंदिर उभारणीसाठी पद्मश्रींनी पुढाकार घेतला. प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांचे योगदान सुद्धा यासाठी सत्कारणी लागले. आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याकडे प्रवरा परिसरातील शेतकरी ऊस गाळपासाठी देत. ऊसाच्या बिलातून पद्मश्रींनी प्रतिटन २५ पैसे एवढीच रक्कम कट करून जमलेला निधी कर्मवीर अण्णांच्या हाती सुपूर्द केला आणि महात्मा गांधी विद्यालयाच्या उभारणीसाठी “सहकार चळवळीच्या” मदतीचा हात पुढे केला.

जाहिरात

पद्मश्रींनी सुरू केलेल्या पहिल्या इंग्रजी माध्यमातील शाळेपासून प्रवरा परिसराच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाची सुरुवात म्हणावी लागेल. काळाच्या ओघात लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी कर्मवीर अण्णा आणि पद्मश्रींच्या विचाराने ग्रामीण शिक्षणाला दिलेली नवी दिशा परिसरातील पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उपयुक्त ठरली. अनेक पिढ्या या शिक्षणाच्या पंढरीतून ज्ञानाची शिदोरी घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या; पण प्रवरेच्या भूमीत सुरू झालेल्या क्रांतीचे आपण घटक आहोत, ही आत्मीयता आज कुठेही कमी झालेली नाही.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे