संजीवनी शैक्षणिक संकुलात वटसावित्री पौर्णिमा उत्साहात

संजीवनी शैक्षणिक संकुलात वटसावित्री पौर्णिमा उत्साहात
डॉ. मनाली कोल्हे यांची उपस्थिती : वृक्षसंवर्धनासोबतच सांस्कृतिक संवर्धनाचा संकल्प
Kopargaon vijay kapse दि १ जुलै २०२६ : सोमवारी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, संजीवनी युनिव्हर्सिटी आणि संजीवनी महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी वटवृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. तसेच भारतीय सण-उत्सव आणि संस्कृती जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमामध्ये संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांतील महिला प्राध्यापक यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वटवृक्षाचे विधिवत पूजन केले. हातात पूजासाहित्य, कपाळावर कुंकू आणि पारंपरिक साड्यांनी नटलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालत कुटुंबाच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच अखंड सौभाग्य लाभावे, अशी प्रार्थना केली. यावेळी युवतींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

या कार्यक्रमानिमित्त वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ. मनाली कोल्हे यांनी शिक्षणासोबतच संस्कृती व सांस्कृतिक मूल्ये, विविधता आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश दिला. त्या म्हणाल्या की, “आधुनिकतेचा स्वीकार करत असतानाच संस्कृतीशी असलेली आपली नाळ जोडून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वटसावित्रीसारखा सण कुटुंबवत्सलता, निष्ठा, समर्पण, परस्पर आदर याची शिकवण देणारा सण आहे. असे सण-परंपरा साजरे करून आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संजीवनीमध्ये आम्ही केवळ शिक्षण देत नाही, तर अशा उपक्रमांतून भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे जतन करण्यालाही तितकेच महत्त्व देतो. कारण, शिक्षणाबरोबर संस्कारांची आणि संस्कृतीची जपणूक झाली, तरच सक्षम आणि संवेदनशील समाज घडू शकतो. आमच्या कॅम्पसमध्ये देशातील विविध राज्यांतील प्राध्यापक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे वटसावित्री असो की दांडिया सर्वच सण आम्ही एकत्र येत उत्साहात साजरे करतो. अशा उपक्रमांमुळे विविध भारतीय संस्कृतींची ओळख होते, परस्पर आदराची आणि एकोप्याची भावना वाढते.”

पर्यावरण संवर्धनाबाबत त्या म्हणाल्या, “भारतीय संस्कृतीने निसर्गाला नेहमीच ऋषितुल्य मानले आहे. वटपौर्णिमेनिमित्त आपण वटवृक्षाची पूजा करतो; मात्र काही ठिकाणी वडाच्या फांद्या तोडून त्यांची पूजा केली जाते. हे योग्य नाही. वटवृक्षाचे संरक्षण करणे आणि वृक्षाची पूजा करणे, हाच या सणाचा खरा संदेश आहे. आज हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली असून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन करण्याचा संकल्प केला, तरच हरित आणि शाश्वत विकास घडवणे शक्य होईल.”
कार्यक्रमास राजश्री ठाकूर, डॉ. सरिता पवार, डॉ. कविता राणी, डॉ. आर. प्रिया, डॉ. देवयानी भामरे यांच्यासह संजीवनीमध्ये कार्यरत विविध महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



