संवत्सर जिल्हा परिषद शाळा : गुणवत्तेचा, नवोपक्रमांचा आणि आधुनिक शिक्षणाचा राज्यासाठी आदर्श नमुना

संवत्सर जिल्हा परिषद शाळा : गुणवत्तेचा, नवोपक्रमांचा आणि आधुनिक शिक्षणाचा राज्यासाठी आदर्श नमुना
संवत्सर जिल्हा परिषद शाळा : गुणवत्तेचा, नवोपक्रमांचा आणि आधुनिक शिक्षणाचा राज्यासाठी आदर्श नमुना

Kopargaon vijay kapse दि १३ जुलै २०२६– उच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता, अत्याधुनिक भौतिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या बळावर संवत्सर जिल्हा परिषद शाळेने राज्यातील आदर्श शाळांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम यामुळे ही शाळा आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. शाळेचे भव्य प्रवेशद्वार, संरक्षक कंपाउंड वॉल, शैक्षणिक संदेश देणारे आकर्षक रंगकाम, स्वच्छ, हिरवागार आणि निसर्गरम्य परिसर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर विद्यार्थ्यांचे सुंदर शिल्प सर्वांचे स्वागत करते.

शाळेच्या आवारात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ओपन सायन्स पार्क, परसबाग, राशी उद्यान, बालवाटिका, सौरऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, विज्ञान प्रयोगशाळा, बालस्नेही बहुउद्देशीय सभागृह, संगणक प्रयोगशाळा, इंटरअॅक्टिव्ह बोर्डयुक्त वर्गखोल्या, टॅब सुविधा, समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज डायनिंग हॉल, ओपन जिम, खेळाचे विस्तीर्ण मैदान, हँडवॉश स्टेशन आणि स्वच्छतागृहे अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. परसबागेत भाजीपाला व फळझाडांची लागवड करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव दिला जातो.

शाळेत सन १९०८ पासूनचे डिजिटल दाखले जतन करण्यात आले असून ते एका क्लिकवर उपलब्ध होतात. तसेच पाला-पाचोळ्यापासून गोबर गॅस, गांडूळ खत व सेंद्रिय खत निर्मिती करून पर्यावरणपूरक उपक्रमही राबविले जातात. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीतही शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पहिलीतील विद्यार्थी तीन अंकी तर दुसरीतील विद्यार्थी चार अंकी संख्यांवरील गणिती क्रिया सहजपणे करतात. गतवर्षी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत २१ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले, त्यापैकी एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकला. गेल्या पाच वर्षांत ६० हून अधिक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा लॅपटॉपच्या साहाय्याने नियमित सराव घेतला जात असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या योजनेत शाळेने सलग दोन वर्षे विभागस्तरीय पारितोषिके मिळविली आहेत. तसेच स्कॅफ उपक्रमात महाराष्ट्रातील प्रथम दहा शाळांमध्ये स्थान पटकावले आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शाळेचे राज्यस्तरीय मूल्यांकन पूर्ण झाले असून निकालाची उत्सुकता आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी शिक्षक दर रविवारी सुट्टीच्या दिवशीही शाळेत येऊन मार्गदर्शन करतात. त्यामुळे दरवर्षी पहिलीचे प्रवेश मार्च महिन्यातच पूर्ण होतात. विशेष म्हणजे, पात्र विद्यार्थ्यांपेक्षाही अधिक प्रवेश होत असून गेल्या पाच वर्षांत इंग्रजी माध्यमातील ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे.
राज्य शासनाच्या एज्युकेशन दौरा उपक्रमासाठी निवड झालेल्या राज्यातील ३६ शाळांमध्ये संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. तसेच शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन मुख्याध्यापक श्री. फैय्याजखान पठाण यांची महाराष्ट्र शासनातर्फे सिंगापूर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती.
शाळेच्या विकासासाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे पाटील, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे. मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही शाळा आज राज्यातील इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
डिजिटल शिक्षण, प्रकल्पाधारित अध्यापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व जीवनकौशल्यांच्या विकासावर भर देणारी संवत्सर जिल्हा परिषद शाळा ही ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील एक उज्ज्वल आदर्श ठरत असून, गुणवत्तेच्या नव्या उंची गाठणारी ही शाळा राज्याच्या शैक्षणिक नकाशावर आपला ठसा अधिकाधिक गडद करत आहे.








