८ ऑगस्टपूर्वी मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा; नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – आमदार विवेक कोल्हे
८ ऑगस्टपूर्वी मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा; नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – आमदार विवेक कोल्हे
८ ऑगस्टपूर्वी मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा; नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – आमदार विवेक कोल्हे
Kopargaon vijay kapse दि २० जुलै २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील प्रत्येक पात्र मतदाराने ०८ ऑगस्ट २०२६ पूर्वी एन्यूमरेशन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन आमदार विवेक कोल्हे यांनी केले आहे.

मतदार यादी ही लोकशाहीचा मूलभूत आधार असून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. या विशेष मोहिमेद्वारे मतदार यादीतील नाव, पत्ता, छायाचित्र तसेच इतर तपशीलांची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांना आवश्यक सहकार्य करून एन्यूमरेशन फॉर्म वेळेत भरावा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आमदार कोल्हे यांनी नमूद केले.

अपूर्ण माहिती, चुकीचा पत्ता किंवा आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे अनेकदा मतदारांना मतदानाच्या दिवशी अडचणींना सामोरे जावे लागते. अशा समस्या टाळण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपल्या नावाची, छायाचित्राची व इतर सर्व माहितीची खात्री करून घ्यावी. कोणतीही त्रुटी आढळल्यास ती तातडीने दुरुस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून हा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असे आमदार विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले.

तसेच नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून ०८ ऑगस्ट २०२६ पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. प्रत्येक नागरिकाने ही माहिती आपल्या कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी आणि इतर पात्र मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांनाही वेळेत एन्यूमरेशन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही आमदार विवेक कोल्हे यांनी केले आहे.



