अजितदादांचे नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि निर्णयक्षम कार्यशैली महाराष्ट्र सदैव स्मरणात राहील – माजी आ. अशोकराव काळे

अजितदादांचे नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि निर्णयक्षम कार्यशैली महाराष्ट्र सदैव स्मरणात राहील – माजी आ. अशोकराव काळे
अजितदादांचे नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि निर्णयक्षम कार्यशैली महाराष्ट्र सदैव स्मरणात राहील – माजी आ. अशोकराव काळे

Kopargaon vijay kapse दि २२ जुलै २०२६–राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा माजी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वगुणांना उजाळा दिला.
यावेळी बोलताना अशोकराव काळे म्हणाले की, स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. विकासकामांना दिलेले प्राधान्य, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि प्रशासनावरील भक्कम पकड यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले. त्यांनी घालून दिलेला विकासाचा मार्ग पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून त्यांचे नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि निर्णयक्षम कार्यशैली महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल.

बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची आठवण करून देत काळे म्हणाले, “आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना मन सुन्न होते. सामाजिक आणि राजकीय जीवनात तावून-सुलाखून निघालेले अजितदादांसारखे नेतृत्व घडण्यासाठी अनेक दशके लागतात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जिव्हाळ्याचे संबंध जपणारे दादा अचानक आपल्यातून निघून जातील, अशी कल्पनाही केली नव्हती.”
ते पुढे म्हणाले की, विरोधी पक्षातील आमदारांनाही विकासकामांसाठी उदारपणे निधी देणारे अर्थमंत्री म्हणून त्यांनी अजितदादांना जवळून अनुभवले. स्वतः विरोधी पक्षाचा आमदार असतानाही मतदारसंघातील अनेक विकासकामांसाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेले.

अजितदादांच्या कार्यशैलीचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा, प्रशासनावरील भक्कम पकड आणि विकासाभिमुख निर्णयक्षमता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक गुण असल्याचे सांगितले. राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून, त्यांनी सांभाळलेल्या प्रत्येक पदाला न्याय दिला, असेही काळे यांनी नमूद केले.
कार्यक्रमानंतर कारखाना परिसरात संचालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक राजेंद्र घुमरे, सूर्यभान कोळपे, दिलीपराव बोरनारे, श्रीराम राजेभोसले, सचिन चांदगुडे, शंकरराव चव्हाण, सुनील मांजरे, मनोज जगझाप, प्रशांत घुले, डॉ. मच्छिंद्र बर्डे, अशोकराव मवाळ, विष्णू शिंदे, श्रावण आसने, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


