दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात विराट मशाल मोर्चा

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात विराट मशाल मोर्चा
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांचा सहभाग; केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangmner vijay kapse दि २३ जुलै २०२६: दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विराट मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक, युवक, महिला तसेच विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदविला.
संगमनेर बसस्थानकापासून माळीवाडा येथील महात्मा फुले स्मारकापर्यंत निघालेल्या या मोर्चात काँग्रेस, शिवसेना, छात्र भारती, आरपीआय, दलित पॅंथर, सत्यशोधक समाज, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, एनएसयूआयसह विविध पुरोगामी संघटनांनी सहभाग घेतला.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शिवसेनेचे अमोल बोराडे, काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, ॲड. अमोल शेरकर, छात्र भारतीचे तुषार पानसरे, ॲड. रंजना गवांदे, ॲड. समीर लामखडे, नूर मोहम्मद शेख, बाळासाहेब घोडके, दत्ता ढगे, अरबाज शेख, भगवान अहिरे, संदीप काकड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोर्चाला संबोधित करताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका करत, देशात विकासाऐवजी जात आणि धर्माच्या राजकारणाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचे सांगत, राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. देशात लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोर्चादरम्यान “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “लोकशाही वाचवा”, “केंद्र सरकारचा निषेध असो” अशा घोषणा देण्यात आल्या. पावसाच्या रिमझिम सरींमध्येही मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविल्याने बसस्थानक ते माळीवाडा हा परिसर मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. मोठ्या गर्दीमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
सरकारविरोधात तरुणाई आक्रमक
संगमनेर बसस्थानक ते महात्मा फुले स्मारक या मार्गावर निघालेल्या मशाल मोर्चात युवक, महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला.






