आषाढीवारी अध्यात्माचा सोहळा; जगासाठी दिशादर्शक – बाळासाहेब थोरात; पांडुरंगाच्या कृपेने अल निनोचा धोका टळला; संगमनेरमध्ये आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी

Sangmner vijay kapse दि २५ जुलै २०२६-आषाढी एकादशीच्या निमित्ताने संगमनेर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. चैतन्यनगर येथील विठ्ठल मंदिरात काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी आषाढी वारी हा समता, एकता आणि अध्यात्माचा सोहळा असून तो संपूर्ण जगासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन केले.
थोरात म्हणाले, “पंढरपूरचा पांडुरंग हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. यंदा अल निनोमुळे दुष्काळाची भीती व्यक्त केली जात होती. मात्र पांडुरंगाच्या कृपेने राज्यात समाधानकारक पाऊस झाला असून शेतकरी आणि नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे. भंडारदरा, निळवंडे, आढळा-भोजापूर यांसह परिसरातील धरणे भरल्याने शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे.”

ते पुढे म्हणाले की, शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या आषाढी वारीत लाखो वारकरी जात, धर्म, पंथ यांचा भेद विसरून एकत्र येतात. संतांच्या समतेच्या आणि मानवतेच्या विचारांचा हा उत्सव समाजाला एकात्मतेचा संदेश देणारा आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, “मानवता हाच खरा महाराष्ट्र धर्म आहे. संत आणि समाजसुधारकांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याची आज अधिक गरज आहे. समाजात वाढणाऱ्या अंधश्रद्धा आणि धार्मिक वादांना आळा घालण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.”

डॉ. जयश्री थोरात यांनी आषाढी वारी हा आनंद, भक्ती आणि समर्पणाचा सोहळा असल्याचे सांगत टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा अनुभव प्रत्येकासाठी अविस्मरणीय असल्याचे नमूद केले. दुर्गा तांबे व नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनीही उपस्थितांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.