अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी; वारकरी परंपरेतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी; वारकरी परंपरेतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी; वारकरी परंपरेतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Sangmner vijay kapse दि २५ जुलै २०२६: आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने २३ व २४ जुलै रोजी उत्साहात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि संतांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांच्या सहभागामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थी व शिक्षकांनी अमृतेश्वर मंदिर येथे, तर प्राथमिक विभागातील विद्यार्थी व शिक्षकांनी घुलेवाडी फाटा ते ग्रामदैवत मंदिरापर्यंत वृक्षदिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या प्रसंगी घुलेवाडीच्या सरपंच सौ. निर्मलाताई राऊत, सदस्य चंद्रकांत क्षीरसागर, युवा कार्यकर्ता ऋत्विक राऊत तसेच ग्रामपंचायतीचे अन्य सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनी दिंडीचे स्वागत करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.

दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संतांची व वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. हातात टाळ, मृदंग, रोपे आणि वृक्षसंवर्धनाचे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या तालावर ठेका धरला. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे दर्शन घडविले.
अभंगांच्या गजरात शिस्तबद्धरीत्या निघालेल्या या वृक्षदिंडीचे शहरातील नागरिक तसेच मंदिर परिसरातील भाविकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनीही उपस्थितांची मने जिंकली.

या उपक्रमाचे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात, विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक-प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, डायरेक्टर अकॅडमिक जे. बी. गुरव, प्राचार्य आशिषकुमार सर तसेच सर्व विभागप्रमुख यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




