माजी सैनिक स्मारकासाठी थोरात कारखान्याकडून ४२ गुंठे जागा; कारगिल दिनानिमित्त वीरमाता व वीरपत्नींचा गौरव

माजी सैनिक स्मारकासाठी थोरात कारखान्याकडून ४२ गुंठे जागा; कारगिल दिनानिमित्त वीरमाता व वीरपत्नींचा गौरव
माजी सैनिक स्मारकासाठी थोरात कारखान्याकडून ४२ गुंठे जागा; कारगिल दिनानिमित्त वीरमाता व वीरपत्नींचा गौरव
Sangmner vijay kapse दि २६ जुलै २०२६ : कारगिल विजय दिवसानिमित्त स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या वतीने मालपाणी लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये उभारण्यात येणाऱ्या माजी सैनिक स्मारकासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ४२ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. कारगिल विजय हा भारतीय सैन्याच्या शौर्याचा इतिहासातील सुवर्णक्षण असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी मिळवलेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सीमेवर रात्रंदिवस तैनात असलेल्या सैनिकांमुळेच देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगू शकतात, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या विविध युद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याचा उल्लेख करताना त्यांनी व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेवराव जाधव यांच्या स्मारकासाठी स्वराज्य सैनिक समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. वेल्हाळे परिसरातील कारखान्याची ४२ गुंठे जागा या समितीला देण्यात येणार असून, त्या ठिकाणी राज्यातील आदर्श माजी सैनिक स्मारक उभारले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रामहरी कातोरे, मेजर भाऊसाहेब पोखरकर, तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर, कॅप्टन सुभाष कुडेकर, सुनील थोरात, प्रा. बाबा खरात, किसनभाऊ हासे, जितेश लोढा, युवराज गांजवे, सौ. रोहिणी कोटकर यांच्यासह स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुधीर तांबे यांनी भारतीय सैन्याच्या राष्ट्रएकात्मतेतील योगदानाचा गौरव करत सैनिकांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी कार्य करणाऱ्या समितीला ४२ गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कारखान्याचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सुनील थोरात यांनी केले. यावेळी तालुक्यातील सैनिकांचे कुटुंबीय, नागरिक, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मालपाणी लॉन्सपर्यंत भव्य रॅली काढून “वंदे मातरम्” आणि “जय जवान, जय किसान” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
समाजभूषण पुरस्कारासह वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान
डोंगरगाव येथील हरिभाऊ उगले यांना स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वीरपत्नी वैशाली बडे, वर्षा घोडेकर, सुरेखा पवार, मनीषा गुंजाळ, मंगल वलटे, सिंधुताई मनसुख आणि वीरमाता लहानुबाई ढगे यांचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.











