आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात

आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात
आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात

Sangmner vijay kapse दि २७ जुलै २०२६ : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने संगम ग्राम विकास मंडळ (संग्राम), संगमनेर संचलित डॉ. देवेंद्र ओहरा स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन (Intellectual Disability) येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्तिमय दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
या दिंडीत विद्यालयातील सर्व दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी आदी पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिंडीचे आकर्षण वाढविले. विद्यालयातून हरिनामाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर मूकबधिर विद्यालयात पहिले रिंगण पार पडले. हरिनामाच्या अखंड जपाने परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

यानंतर दिंडी वाजत-गाजत इथापे मेडिकल कॉलेज येथे पोहोचली. यावेळी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीत सहभागी होत भक्तीचा आनंद लुटला.
दिंडीचे विशेष आकर्षण ठरले ते घुलेवाडी येथील गंगा भानू वारकरी मुलींची शिक्षण संस्था. संस्थेच्या सौ. अनिताताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी विद्यालयातील विद्यार्थिनींनी टाळ, मृदुंग आणि वीणेच्या साथीने विठ्ठल नामाचा गजर करत संपूर्ण परिसर भक्तिमय केला. त्यांच्या सहभागामुळे दिंडीचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या भक्तिमय दिंडीच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वारकरी परंपरेचा आनंद अनुभवण्याची संधी मिळाली.



