सई रासकरची तैवानमध्ये इंटर्नशिपसाठी पुन्हा निवड; करंजीच्या कन्येची जागतिक संशोधन क्षेत्रात भरारी

सई रासकरची तैवानमध्ये इंटर्नशिपसाठी पुन्हा निवड; करंजीच्या कन्येची जागतिक संशोधन क्षेत्रात भरारी
सई रासकरची तैवानमध्ये इंटर्नशिपसाठी पुन्हा निवड; करंजीच्या कन्येची जागतिक संशोधन क्षेत्रात भरारी

Kopargaon vijay kapse दि ३१ जुलै २०२६– तालुक्यातील करंजी येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र रघुनाथ रासकर यांची नात तसेच गोदावरी दूध संघाचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश रासकर व करंजी येथील अंगणवाडी सेविका वर्षा रासकर यांची कन्या सई प्रकाश रासकर हिची तैवान येथे होणाऱ्या संशोधन प्रकल्प – 3D स्कॅफोल्ड्स तयार करणे आणि पुनरुत्पादक वैद्यक क्षेत्रातील त्यांचे अनुप्रयोग. या संशोधन प्रकल्पासाठी इंटर्नशिपसाठी पुन्हा एकदा निवड झाली आहे. या निवडीमुळे करंजी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सई रासकर ही संजीवनी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून, संशोधन क्षेत्रातील तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिला ही प्रतिष्ठेची संधी मिळाली आहे. यापूर्वीही तिने तैवानमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोग पेशींमध्ये जैवसक्रिय घटकांमुळे निर्माण होणाऱ्या पेशीविषारी परिणामकारकतेचे आणि पेशीमृत्यूच्या विविध मार्गांचे मूल्यांकन या संशोधन विषयावर इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तिची निवड झाल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याप्रसंगी संजीवनी युनिव्हर्सिटीचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सई रासकर, तिची आजी संध्या रासकर, आई वर्षा रासकर व चुलते विपुल रासकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमित कोल्हे म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करावी, हे संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते. आज संजीवनीच्या विद्यार्थ्यांना विविध देशांमध्ये इंटर्नशिपच्या संधी मिळत असून, त्यातून ते स्व. कोल्हे यांचे स्वप्न साकार करत आहेत. आमचा विद्यार्थी सातासमुद्रापार इंटर्नशिप किंवा उच्च शिक्षणासाठी जातो, तेव्हा आमची मान अभिमानाने उंचावते.” ते पुढे म्हणाले, “परदेशात भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परदेशी भाषांचे ज्ञान आत्मसात करण्यास प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्थेची स्वायत्तता महत्त्वाची असून, त्यातून उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विकसित करून अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येते. संजीवनीने कायमच दर्जेदार शिक्षण दिले असून, आता एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये स्थान मिळविण्याचे आमचे ध्येय आहे.”
सई रासकरच्या या यशामुळे करंजीसह संपूर्ण कोपरगाव तालुक्याचा शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक उंचावला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिचे यश प्रेरणादायी ठरत आहे.




