शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा; सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – ना. राधाकृष्ण विखे पाटील

शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा; सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – ना. राधाकृष्ण विखे पाटील
शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा; सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – ना. राधाकृष्ण विखे पाटील

Loni vijay kapse दि ३१ जुलै २०२६- राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजना यशस्वी करण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवावा. शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक तालुक्यात व्हावी, यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

लोणी येथील जनसेवा कार्यालयात आयोजित जनता दरबारात त्यांनी जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक प्रश्नांवरील निवेदने स्वीकारली. जिल्हा व तालुका स्तरावरील प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. मंत्रालय स्तरावरील प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याची ग्वाहीही त्यांनी नागरिकांना दिली.
जनता दरबारानंतर मंत्री विखे पाटील यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्य व केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शेतकरी, महिला आणि युवकांच्या हितासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये, तसेच शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत यासाठी योग्य मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कृषी, महावितरण आणि इतर संबंधित विभागांनी योजनांचा अधिक व्यापक प्रचार-प्रसार करून लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पाणीस्थितीचाही आढावा घेतला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली असली तरी काही तालुक्यांत अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने सिंचनाची समस्या कायम आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना आवश्यक सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना आतापासूनच करण्याचे निर्देश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले.
सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वेळेत मिळावेत, यासाठी महसूल विभागाने विशेष लक्ष देऊन विलंब टाळावा, असेही त्यांनी सांगितले. जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर १५ दिवसांच्या आत कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही ना. विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.




