चार हजार कोटींच्या आ.काळे यांच्या दाव्याचा उडाला फज्जा: टाकळी-ब्राम्हणगाव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक संतप्त
चार हजार कोटींच्या आ.काळे यांच्या दाव्याचा उडाला फज्जा: टाकळी-ब्राम्हणगाव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक संतप्त
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि ५ ऑगस्ट २०२६-कोपरगाव मतदारसंघात आ.काळे यांचे विकासकामांच्या नावाखाली करण्यात आलेल्या चार हजार कोटी रुपयांच्या दाव्याचा फज्जा उडाल्याचे वास्तव आता नागरिकांसमोर आले आहे. टाकळी-ब्राम्हणगाव या महत्त्वाच्या रस्त्याची अवघ्या काही काळातच झालेली अत्यंत दयनीय अवस्था ही निकृष्ट दर्जाची साक्ष देत असून, संपूर्ण मतदारसंघातील रस्त्यांची झालेली चाळणी पाहता विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी भावना अशोक बनकर यांनी व्यक्त केली आहे.
जाहिरात
टाकळी-ब्राम्हणगाव मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले आहे व दगड उघडे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकऱ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती आणखी बिकट होत असून अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.जाहिरात
एकीकडे चार हजार कोटींच्या विकासकामांचा गवगवा केला जात असताना प्रत्यक्षात नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. टाकळी-ब्राम्हणगाव रस्ता हा केवळ एक नमुना असून मतदारसंघातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था यापेक्षाही गंभीर आहे. त्यामुळे मोठमोठ्या घोषणांपेक्षा दर्जेदार आणि टिकाऊ विकासकामांची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मागील पंचवार्षिक कार्यकाळ आणि त्यानंतरचा सध्याचा कार्यकाळ तरीही मतदारसंघात सर्वसामान्यांना जाणवेल असा विकास दिसून येत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. रस्ते, पाणी, पायाभूत सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे आ.काळे यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
चार हजार कोटी रुपयांच्या दाव्याचा गवगवा करण्याऐवजी प्रत्यक्षात झालेल्या कामांची गुणवत्ता आणि त्याचा जनतेला झालेला लाभ याचा हिशेब देण्याची वेळ आता आली आहे. टाकळी- ब्राम्हणगाव रस्त्यासह मतदारसंघातील सर्व निकृष्ट रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही बनकर यांनी दिला आहे.