आमदार आशुतोष काळेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरु

आमदार आशुतोष काळेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरु
आमदार आशुतोष काळेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरु

Kopargaon vijay kapse दि ५ ऑगस्ट २०२६- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्य सरकारतर्फे आपले सरकार सेवा केंद्र (सेतू केंद्र) मंजूर करण्यात आले असून मंगळवार (दि.०४) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे यांच्या हस्ते आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

दरवर्षी शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांसाठी तालुका स्तरावर किंवा खाजगी सेतू केंद्रांवर चकरा माराव्या लागत असत. शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यापासून ते उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि नॉन-क्रिमीलेयर अशा अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असे. त्यातच परिसरात सध्या कार्यरत असलेली सेतू केंद्रे अपुरी पडत असल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांची पायपीट थांबावी या सामाजिक बांधिलकीतून महाविद्यालय प्रशासनाने संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडे सेतू केंद्र मंजुरीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी व महविद्यालय परिसरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सर्व शासकीय दाखले आणि ऑनलाईन सुविधा आता सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे.

या सेवा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक दाखल्यांसोबतच स्पर्धा परीक्षांचे अर्ज दाखल करता येणार असून नागरीकांना आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड आणि शेतकरी बांधवांसाठी असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचे लाभही सहजरित्या मिळवता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. संस्थेच्या महाविद्यालयात सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना कोणत्याही शासकीय दाखल्यासाठी किंवा ऑनलाईन कामासाठी खाजगी केंद्रांवर अवलंबून राहावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वेळेतच या सेतू केंद्र सुविधेचा लाभ घेता येणार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा शासकीय दाखला काढण्यासाठी विद्यार्थ्यांना द्यावा लागणारा वेळ वाचणार आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या शासकीय सेवा केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे यांनी केले आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य वसीम शेख आदींसह सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक,प्राध्यापिका उपस्थित होते.



