जुन्नरमध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक: दोषींना फाशीची शिक्षा व्हावी- बाळासाहेब थोरात
जुन्नरमध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक: दोषींना फाशीची शिक्षा व्हावी- बाळासाहेब थोरात

याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, माणुसकीला काळिमा फासणारी जुन्नर येथील घटना आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करतो. या घटनेची सखोल, निष्पक्ष आणि जलद चौकशी करून दोषी नराधमावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी करून चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे.
अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी व तत्पर अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित राहील, यासाठी शासन आणि प्रशासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत असेही ते यावेळी म्हणाले.

जुन्नर घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी – सत्यजित तांबे
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. आपल्या समाजात इतक्या राक्षसी प्रवृत्तीचे नराधम वावरत आहेत, आपल्या मुलींवर सातत्याने अत्याचारांची टांगती तलवार आहे. ही बाब मला केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून धक्का देणारी आहे.
पिंपळवंडीतील त्या नराधमाच्या अत्याचारांना बळी पडलेल्या चिमुकलीने किती यातना भोगल्या असतील, तिचे आई-वडील आता कोणत्या परिस्थितीतून जात असतील याची कल्पनाही करवत नाही. अशा अमानुष प्रकारांना आळा घालण्यासाठी दोषी नराधमास कठोर शिक्षा व्हावी, अशी शासनाकडे आग्रहाची मागणी आहे. असे आ. सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे

जुन्नर मधील घटना ही मानवतेला काळीमा फासणारी- डॉ जयश्री थोरातजुन्नर तालुक्यामध्ये लहानग्या चिमुकलीवर नराधमाने केलेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. महाराष्ट्र व केंद्र सरकारने याबाबत अत्यंत कठोर कायदा करण्याची गरज असून जेणेकरून यापुढे असे कृत्य करताना नराधमांना मोठा धाक निर्माण होईल. या घटनेतील आरोपीला तातडीने कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करताना झालेली घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे


