कोपरगावकरांच्या जनआक्रोश आंदोलनाला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगावकरांच्या जनआक्रोश आंदोलनाला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जनआक्रोश आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन करू- पद्माकांत कुदळे
Kopargaon vijay kapse दि १९ ऑगस्ट २०२६– कोपरगाव शहरात मोकाट जनावरांमुळे दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी मोकाट जनावरांच्या बाबतीत नागरिकांना त्रास होऊ नये याबाबत कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. तरी सुद्धा पालिका प्रशासनाकडून मोकाट जनावरांबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही ते काय तुमचे नातेवाईक आहे का? असा उपरोधिक सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला असून कोपरगाव शहराला समृद्धी मिळाली नाही तरी चालेल पण नागरिकांना मूलभूत सुविधा आणि सुशासन मिळावे हीच माफक अपेक्षा आहे. त्यासाठी आज हे जनआक्रोष आंदोलन करण्यात आले आहे. जर तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने नगरपरिषदेवर दबाव आणून कारवाई केली नाही तर या आंदोलनापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि त्याचे जे काही परिणाम होईल त्याला कोपरगाव नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशारा माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी दिला आहे.

सुस्त नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी बुधवार (दि.१९) रोजी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीत भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी पद्माकांत कुदळे बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील गंगुले म्हणाले कि, मागील वर्षी पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत खोटे बोलून सत्ता मिळवली. १०० दिवसात १०० कामे पूर्ण करू अशी आश्वासन दिली. या आश्वासनात मोकाट जनावरांचा प्रश्न देखील मार्गी लावू असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र कोपरगाव नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांचा भ्रमनिरास केला असून मोकाट जनावरांच्या उच्छादापाई दोन निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. याला कोपरगाव नगरपालिका सत्ताधारी जबाबदार आहेत. खोटं बोलून, कोपरगावकरांचा विश्वासघात करून सत्ता मिळवली व शंभर दिवसात शंभर कामे केलीच नाही. त्यामुळे यापुढे कोपरगावकरांसाठी तुम्हाला रस्त्यावर उतरून जाब विचारू असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील गंगुले यांनी कोपरगाव नगरपालिका सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

ते पुढे म्हणाले की, समस्त कोपरगावकरांनी जनआक्रोश आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी बाजार तळ याठिकाणी गोशाळा सुरू करणार असे सांगितले. मात्र त्याठिकाणी गेल्यानंतर सत्ताधारी नगरसेवकांमध्ये वाद झाले यावरून तुम्ही खरंच गोशाळा सुरू करणार का? असा प्रश्न सुनील गंगुले यांनी उपस्थित केला. तुम्ही जर गोशाळा सुरू करू शकत नसाल तर कोपरगावकरांना जाहीरपणाने सांगा हे काम माझ्या आवाक्या बाहेरचे आहे, हे काम मी करू शकत नाही. आम्ही त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करू असे सांगितले .

परंतु नगराध्यक्ष कोपरगावकरांना वेड्यात काढत आहेत. दोन तीन वेळा मोकाट जाणारे पकडण्याचे टेंडर काढले, परंतु ते टेंडर घेण्यासाठी कोणी पुढे आले नाही त्याचे कारण म्हणजे टेंडर घेणाऱ्या व्यक्तीला आमचे चार कार्यकर्ते ऍडजेस्ट करा असे सांगण्यात येते. त्यामुळे कोणीही टेंडर घेण्यासाठी पुढे येत नाही. कोपरगावचे निष्पाप नागरिक बळी जात असताना तुमच्या पाकीट घेणाऱ्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवत असाल तर तुम्ही काय कोपरगावचे भविष्य ठरवणार. तुम्ही काय आमदार आशुतोष काळेंवर टीका करता टेंडर मध्ये भागीदार कोण चौकशी करा, ठेका भरणारे कोण आहे हे बघा, पाकिटासाठी तुम्ही एकमेकांत भांडतात आणि आमदार आशुतोष काळे यांच्यावर निरर्थक टीका करतात. 
डुकरामुळे एक बळी गेला त्यानंतर नगरपालिकेने किती डुकरे पकडले हे जाहीर पणे सांगावे. आज एका जवानाचा मृत्यू झाला. ज्या जवानाला भारताचा शत्रू मारू शकला नाही त्या जवानाला कोपरगावच्या मोकाट जनावरांनी मारले. मृत्युमुखी झालेल्या त्या दोघांचे प्रपंच उघड्यावर पडले असल्याने त्यांच्या कुटुंबियांना भरपाई द्या. आजचे आंदोलन ही फक्त झलक आहे. तुम्ही खोटे बोलून सत्ता मिळवली पण आम्ही नेहमी जाब विचारात राहू असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील गंगुले यांनी कोपरगाव नगरपालिका सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
आंदोलनादरम्यान काजीनाम नावावर असलेल्या जमिनीपैकी दीड ते दोन एकर जागा गोशाळेसाठी देण्यास आम्ही तयार आहोत. तरी सत्ताधाऱ्यांनी मोकाट जनावरांच्या गंभीर विषयावर राजकारण करू नये अशे मत अय्यूब शेख यांनी स्पष्ट केले. शिवसेना (उबाठा) पक्षाचे असलम शेख यांनी नगराध्यक्षांच्या आश्वासनांवर कडाडून टीका केली. नगराध्यक्षांनी प्रचारात १०० दिवसांत १०० कामे करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात १०० कामांऐवजी १०० ढापेही ते टाकू शकले नाही. प्रशासक काळात काय झाले याचे रडगाणे किती दिवस गाणार असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच गगन हाडा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जनावरांच्या वावरामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले असून खुद्द पोलिसांनाही या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ज्येष्ठ नागरिक विजय बंब यांनी नगरपालिकेला विनंती केली की या मोकाट जनावरांचा तात्काळ व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. मनसेचे अनिल गायकवाड यांनी प्रशासनाला इशारा देत पालिकेने या प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास मनसेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल असे सांगितले.
हाजी मेहमूद सय्यद यांनी प्रशासकीय निष्काळजीपणावर प्रकाश टाकत सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच नागरिकांनी यासंदर्भात निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. मुख्य रस्त्यांवर ठिय्या मांडणाऱ्या या जनावरांमुळे विद्यार्थी, नागरिक व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून पालिका प्रशासन कारभारात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कृष्णा आढाव यांनी या समस्येकडे लक्ष वेधणाऱ्या पत्रकारांचे आभार मानले. व लाखो रुपये खर्चून बांधलेला स्विमिंग पूल नागरिकांच्या उपयोगी पडला नाही. तो स्विमिंग पूल या जनावरांसाठी तरी वापरावा असा टोला कृष्णा आढाव यांनी सत्ताधाऱ्यांना लावला आहे.
यावेळी कोपरगाव नगरपालिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या गौरीताई पहाडे, नगरसेवक विजय त्रिभुवन, मंदार पहाडे सचिन गवारे यांच्यासह अनेक उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.

यावेळी या आंदोलनात विनय भगत, अनिल गायकवाड, अमित आढाव, मुन्ना मन्सुरी, विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यमराजाची वेशभूषा करून भावेश थोरात यांनी आंदोलन कर्त्यांचे लक्ष वेधले. यावेळी भावेश थोरात यांनी नगराध्यक्षांनी १०० दिवसांत १०० कामे नव्हे, तर १०० बळी घेण्याचे ठरवले आहे की काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

