आपला जिल्हा

‘दरबार नाही… व्यासपीठ आहे; १ ते २५ सप्टेंबरदरम्यान संगमनेरात प्रभागनिहाय बैठका

‘दरबार नाही… व्यासपीठ आहे; १ ते २५ सप्टेंबरदरम्यान संगमनेरात प्रभागनिहाय बैठका

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या प्रश्नांसाठी थेट संवादाचा उपक्रम

Sangmner vijay kapse दि. ३० ऑगस्ट २०२६ : नागरिकांना आपल्या परिसरातील प्रश्न, समस्या व अडचणी थेट मांडता याव्यात, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींशी समोरासमोर चर्चा करता यावी आणि प्रश्नांवर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही व्हावी, यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने १ ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रभागनिहाय समित्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.

जाहिरात

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, प्रत्येक प्रभागातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपालिकेतील संगमनेर सेवा समितीच्या गटनेत्या दीपाली पंचारिया यांनी दिली.

नागरिकांच्या दारी नगरपालिका

छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी नागरिकांना वारंवार नगरपालिका कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, संबंधित विभागाचा शोध घेण्यासाठी वेळ खर्च होऊ नये आणि तक्रारीच्या पाठपुराव्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये, या उद्देशाने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

‘नागरिकांनी प्रशासनाकडे येण्यापेक्षा नगरपालिका प्रशासनाने नागरिकांपर्यंत पोहोचावे’, हा या उपक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू असणार आहे.

जाहिरात

जनता दरबार नव्हे, नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ

या बैठका कोणताही ‘जनता दरबार’ नसून नागरिकांच्या हक्काचे व्यासपीठ असणार आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रश्न मोकळेपणाने मांडावेत, संबंधित अधिकारी व नगरसेवकांनी ते प्रत्यक्ष समजून घ्यावेत आणि त्यावर पुढील कार्यवाही निश्चित व्हावी, अशा पद्धतीने बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

‘दरबार नाही… व्यासपीठ आहे, नगरपालिका आपल्या सोबत आहेत!’ ही या उपक्रमामागची भूमिका असून, नागरिक आणि नगरपालिका यांच्यातील संवाद व विश्वास अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जाहिरात

कोणते प्रश्न मांडता येणार?

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, अतिक्रमण, उद्याने, नागरी आरोग्य यासह दैनंदिन नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न नागरिकांना बैठकीत मांडता येणार आहेत. तसेच परिसराच्या भविष्यातील विकासाबाबतच्या सूचना व कल्पनाही नागरिकांना मांडता येणार आहेत.

अधिकारी-नगरसेवक राहणार उपस्थित

प्रभागातील नगरसेवकांसोबत संबंधित नगरपालिका अधिकारीही बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रश्न कोणत्या विभागाशी संबंधित आहे, त्यावर कोणती उपाययोजना करता येईल आणि पुढील कार्यवाही कशी होईल, याची माहिती नागरिकांना थेट मिळणार आहे.

प्रश्न ऐकणे → नोंद करणे → जबाबदारी निश्चित करणे → कार्यवाही सुरू करणे → पाठपुरावा करणे, अशा पद्धतीने उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे.

जाहिरात

प्रश्नांसोबत कागदपत्रे आणण्याचे आवाहन

नागरिकांनी बैठकीस येताना आपल्या समस्येबाबतची नेमकी माहिती, आवश्यक कागदपत्रे, पूर्वी केलेला पत्रव्यवहार, अर्ज, छायाचित्रे किंवा लेखी प्रश्नांची यादी सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रश्नांची नोंद घेऊन त्यावर अधिक जलद आणि परिणामकारक कार्यवाही करणे शक्य होणार आहे.

शहर विकासात नागरिकांचा थेट सहभाग

प्रभागनिहाय बैठकीमुळे प्रत्येक भागातील प्रश्नांचे स्वतंत्र चित्र प्रशासनासमोर येणार असून, कोणत्या भागात कोणत्या नागरी सुविधांना प्राधान्याने कामाची गरज आहे, हेही स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या बैठका केवळ तक्रार निवारणापुरत्या मर्यादित न राहता संगमनेरच्या भविष्यातील विकास नियोजनात नागरिकांचा थेट सहभाग वाढविणारे व्यासपीठ ठरणार आहेत.

१ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या बैठकींमध्ये सर्व प्रभागांतील नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रश्न, सूचना व अपेक्षा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

‘पालिकेच्या दारी नव्हे… नगरपालिका नागरिकांच्या दारी!’

नागरिकांचे प्रश्न ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यावर प्रत्यक्ष काम करण्यासाठी अधिकारी व नगरसेवक या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या सोबत राहणार आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे