स्थानिक समस्यांवर जागतिक दर्जाचे उपाय शोधा- आमदार विवेक कोल्हे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

स्थानिक समस्यांवर जागतिक दर्जाचे उपाय शोधा- आमदार विवेक कोल्हे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
संजीवनी विद्यापीठात ‘स्मार्ट कोपरगाव हॅकॅथॉन २०२६’चा ग्रँड फिनाले उत्साहात
Kopargaon vijay kapse दि ३० ऑगस्ट २०२६ : शेती, वाहतूक, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, अन्न व सुरक्षा, उद्योग तसेच पाणी वितरण व्यवस्थेसारख्या स्थानिक समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण व परिणामकारक उपाय शोधण्याची गरज आहे. हॅकॅथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्यांवर जागतिक दर्जाचे उपाय सुचवावेत, असे आवाहन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.

संजीवनी विद्यापीठात आयोजित ‘द ग्रँड फिनाले ऑफ स्मार्ट कोपरगाव हॅकॅथॉन २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे होते.
यावेळी तहसीलदार तथा पदोन्नती झालेले उपजिल्हाधिकारी महेश सावंत, नगराध्यक्ष पराग संधान, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, विद्यापीठाचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकूर, सर्कल ऑफिसर मच्छिंद्र पोकळे, हनुमंत फेरे आदी उपस्थित होते.

या राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये देशभरातील १०० टीममधील सुमारे ४०० इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. शेती, शिक्षण, अन्न व सुरक्षा, दळणवळण, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, खुली नवकल्पना, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांतील स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित स्मार्ट पर्याय शोधण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना विद्यापीठाच्या वतीने १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून, आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनीही अधिक १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच अमित कोल्हे यांनी कचरा व्यवस्थापन विषयावरील सर्वोत्कृष्ट प्रकल्पाला प्रायोजित करण्याची घोषणा केली.
‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी निर्माण करणारे बना’
यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी युवकांना केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचे आवाहन केले. भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनली असून, देशाची युवा शक्ती हीच भारताची सर्वात मोठी ताकद आहे. या युवा शक्तीने देशाच्या आर्थिक प्रगतीत अधिक मोठे योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

तहसीलदार महेश सावंत म्हणाले की, अश्मयुगापासून मानव सातत्याने प्रगती करत आला आहे. मात्र विकासाच्या प्रक्रियेत निसर्गाशी सुसंवाद राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेल्या विकासाचे परिणाम समाजाला भोगावे लागतात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाला संवेदनशीलतेची जोड देणे आवश्यक आहे. या हॅकॅथॉनमधून नवी ऊर्जा, नवे ध्येय आणि नाविन्यपूर्ण कल्पना पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जागतिक संधी
अध्यक्षीय भाषणात अमित कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचे दूरदृष्टीपूर्ण स्वप्न होते. त्याच विचारातून संजीवनी विद्यापीठाची स्थापना झाली असून, ग्रामीण भागातील पहिले विद्यापीठ म्हणून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.
देशासमोर अनेक आव्हाने असली तरी विकसित भारताच्या निर्मितीत तरुणांची भूमिका निर्णायक आहे. ज्ञान, कौशल्य आणि नवकल्पनांच्या बळावर युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. ए. जी. ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत करून हॅकॅथॉनची संकल्पना स्पष्ट केली.



