७२०० किमी प्रवास करणाऱ्या मोनू बेतोरा यांचा बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरव

७२०० किमी प्रवास करणाऱ्या मोनू बेतोरा यांचा बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरव
मोनूची आई-वडिलांप्रती निष्ठा व समर्पण युवकांसाठी प्रेरणादायी : बाळासाहेब थोरात
१२ ज्योतिर्लिंग व ४ धामांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा अनोखा संकल्प
Kopargaon vijay kapse दि १० सप्टेंबर २०२६ : भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांना परमेश्वराचे स्थान दिले जाते. आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांच्या संस्कारांचा वारसा जपत बिहारमधील पाटणा येथील २२ वर्षीय मोनू बेतोरा यांनी देशातील १२ ज्योतिर्लिंगे व ४ धामांची यात्रा पायी धावत पूर्ण करण्याचा अनोखा संकल्प केला आहे. तब्बल ७२०० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या मोनू बेतोरा यांचा काँग्रेस नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोनूचे आई-वडिलांप्रती असलेले निष्ठा, प्रेम व समर्पण युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील मोनू बेतोरा यांचे स्वागत बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, उद्योजक बाळासाहेब देशमाने, योगेश देशमुख, हर्षल काकड यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, बिहार राज्यातील मोनू बेतोरा यांनी आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा वारसा जपत देशातील १२ ज्योतिर्लिंगे व ४ धामांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. भारत हा विविध संस्कृती, भाषा व प्रांतांनी समृद्ध असलेला देश आहे. अशा परिस्थितीत २२ वर्षीय मोनूचा हा धावता प्रवास देशाच्या एकात्मतेचा संदेश देणारा आहे.

बिहार, झारखंड, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक असा प्रवास करत मोनू महाराष्ट्रात आला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर यांसह विविध शिवमंदिरांचे दर्शन तो घेत आहे. अध्यात्म व संस्कृतीसोबतच देशाच्या एकात्मतेचा विचार तो तरुणांपर्यंत पोहोचवत आहे. त्याचा दररोजचा प्रवास निष्ठा, प्रेम व समर्पणाची भावना दर्शविणारा आहे, असेही थोरात म्हणाले.

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारातून देशभरातील १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन धावत घेण्याचा मोनूचा हा अभिनव उपक्रम निश्चितच अभिमानास्पद आहे. भारतामध्ये नेहमीच अतिथींचे मनापासून स्वागत केले जाते. मोनूचे विविध गावांमध्ये नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. तरुणांमध्येही त्याच्याबद्दल मोठी आस्था निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह संगमनेर तालुक्यातून त्याने केलेला प्रवास तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
मोनू बेतोरा म्हणाले की, महाराष्ट्रात माझे अतिशय उत्स्फूर्त स्वागत झाले. संगमनेरमध्ये आल्यानंतर मला घरी आल्यासारखे वाटले. डॉ. जयश्रीताई थोरात यांनी माझी अत्यंत काळजी घेतली. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेण्याची माझी मोठी इच्छा होती. कोल्हापूरहून संगमनेरमार्गे जाणार असल्याचे समजल्यानंतर त्यांची भेट घ्यावी, असे मनात होते. योगायोगाने आज त्यांची भेट झाली, हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे. एवढे मोठे नेते असूनही त्यांचा साधेपणा हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे आशीर्वाद आणि प्रेरणा माझ्यासाठी कायम महत्त्वाची राहील, असे मोनू यांनी सांगितले.
यावेळी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. मोनू यांनी अमृतेश्वर मंदिर तसेच सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणास्थळाचे दर्शन घेतले आणि पुढील प्रवासासाठी ते रवाना झाले. यावेळी युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



