ज्येष्ठ नागरिकांसाठी जलद चालणे स्पर्धा उत्साहात संपन्न; ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ विषयावर अशोक देशमुख यांचे मार्गदर्शन; विजेत्यांचा सन्मान

ज्येष्ठ नागरिकांसाठी जलद चालणे स्पर्धा उत्साहात संपन्न; ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ विषयावर अशोक देशमुख यांचे मार्गदर्शन; विजेत्यांचा सन्मान
ज्येष्ठ नागरिकांसाठी जलद चालणे स्पर्धा उत्साहात संपन्न; ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ विषयावर अशोक देशमुख यांचे मार्गदर्शन; विजेत्यांचा सन्मान

Kopargaon vijay kapse दि २ ऑक्टोबर २०२६–आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समता पतसंस्था, कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच आणि श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळ (निवारा) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी जलद चालणे स्पर्धा, सभासद स्नेहमेळावा आणि आनंदी जीवनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

समता पतसंस्था ते कलश मंगल कार्यालय या मार्गावर झालेल्या जलद चालणे स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार महेश सावंत, प्रांताधिकारी धनंजय बांगर, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे एपीआय दीपक रोठे, कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ. सुधाभाभी ठोळे आणि कार्याध्यक्ष विजय बंब यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे, ९३ वर्षीय चंद्रकला रोहोम यांनीही स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण ९९ ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

तहसीलदार महेश सावंत यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत नियमित व्यायाम आणि चालण्याला जीवनशैलीचा भाग बनवावा, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह निर्माण होऊन त्यांचा सामाजिक सहभाग वाढतो, असे त्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी धनंजय बांगर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि मार्गदर्शन समाजासाठी महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारांसह सामाजिक जीवनात सक्रिय राहून ज्येष्ठांनी आनंदी जीवनाचा आनंद घ्यावा. एपीआय दीपक रोठे यांनी आरोग्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, असे सांगितले. कुटुंबातील सर्व पिढ्यांनी ज्येष्ठांना वेळ, सन्मान आणि आपुलकी देऊन त्यांच्या अनुभवाचा आदर करावा, असे त्यांनी नमूद केले.
कलश मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे डॉ. विलास आचारी यांच्या प्रास्ताविकाने पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. सुप्रसिद्ध व्याख्याते अशोकजी देशमुख यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी जीवन कसे जगावे आणि सर्व वयोगटातील नातेवाईकांनी हसत-खेळत तणावमुक्त जीवनाचा आनंद कसा घ्यावा?’ या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या मिश्कील आणि प्रभावी शैलीत त्यांनी सुमारे तासभर उपस्थितांना खिळवून ठेवले. त्यांच्या मार्गदर्शनादरम्यान सभागृहात हास्याचे वातावरण निर्माण झाले. विविध गीतांवर ज्येष्ठ नागरिकांना ठेका धरायला लावत त्यांनी कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
जलद चालणे स्पर्धेच्या ६० ते ७० वर्षे पुरुष गटात रामदास वाकचौरे यांनी प्रथम, ओमप्रकाश भावसार यांनी द्वितीय, तर नंदू राजगुरू यांनी तृतीय क्रमांक मिळविला. महिला गटात उषाताई कवडे प्रथम, कमल गायकवाड द्वितीय आणि हिराबाई झावरे तृतीय ठरल्या.
७० ते ८० वर्षे पुरुष गटात दिनकर झावरे प्रथम, वसंतराव देशमुख द्वितीय आणि सदाशिव चौधरी तृतीय ठरले. महिला गटात चंद्रकला सावंत-सरकर प्रथम, हर्षदा पटवर्धन द्वितीय आणि रजनी नलगे तृतीय ठरल्या. ८० वर्षांवरील पुरुष गटात घैसास सर प्रथम, दत्तात्रय निकम द्वितीय आणि शिवाजी सोनवणे तृतीय ठरले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी समता पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंदभाई पटेल, कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, सचिव उत्तमभाई शहा, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा सुतार, उद्योजक कैलास ठोळे, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, रजनी गुजराती, शैलेजा रोहोम, जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांच्यासह स्पर्धक, हितचिंतक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय गोरे यांनी केले.
आरोग्यदायी व आनंदी जीवनाचा संदेश
“ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जलद चालणे स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. समता पतसंस्थेच्या या उपक्रमातून ज्येष्ठांसाठी आरोग्यदायी, आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचा संदेश देण्यात आला,” असे काका कोयटे यांनी सांगितले.



