के.जे.सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन

के.जे.सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे नियोजन आवश्यक पीएसआय साईनाथ वर्पे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
Kopargaon vijay kapse दि १४ ऑक्टोबर २०२६ : के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा कोपरगाव पोलीस ठाण्याचे पीएसआय श्री. साईनाथ वर्पे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पीएसआय साईनाथ वर्पे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि परीक्षेच्या तयारीदरम्यान कोणत्या बाबींना प्राधान्य द्यावे, याबाबत सविस्तर माहिती दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना वेळेचे योग्य नियोजन अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाला मोठे महत्त्व आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, त्यामुळे एखाद्या प्रयत्नात अपयश आले म्हणून विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा प्रयत्न करावेत आणि आपले निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे, वाणिज्य विभागप्रमुख प्रो. (डॉ.) एस. आर. पगारे तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रो. (डॉ.) जी. एस. शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. (डॉ.) एस. आर. देवरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नीता शिंदे यांनी केले, तर आभार प्रा. एस. एस. नागरे यांनी मानले. यावेळी डॉ. आर. बी. तलवारे, डॉ. बी. डी. गव्हाणे, प्रो. (डॉ.) व्ही. एस. साळुंके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.




