दुष्काळात सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा— मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

दुष्काळात सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा— मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
अवघड दुष्काळ असल्याने शासनाने तातडीने निर्णय करावेत; थोरात कारखान्याचा ६० वा गळीत हंगाम शुभारंभ
Sangmner vijay kapse दि १४ ऑक्टोबर २०२६— यावर्षी राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असून प्रत्येक कारखान्याने आपली गाळप क्षमता वाढविली आहे. ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण करणारी साखर कारखानदारी आज अडचणीत आली आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यांसह अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीत शासनाने तातडीने निर्णय घेऊन साखर कारखानदारीसह शेतकरी, शेतमजूर, महिला व सर्वसामान्य नागरिकांना मदत करावी, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ६० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, ॲड. माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, बाबा ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात, शरद नाना थोरात, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, संचालक संतोष हासे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजणे, दिलीप नागरे, बंडु नाना भाबड, लता गायकर, सुंदरा डुबे आदी उपस्थित होते. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यामध्ये साखर कारखान्यांची संख्या वाढली आहे. कमी दिवसांत अधिक गाळप करण्यासाठी कारखान्यांनी आपली क्षमता वाढविली आहे. मात्र दिवसेंदिवस उसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे कारखान्यांमध्ये उसासाठी जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली असून साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. थोरात कारखान्याने कायमच सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक व कामगारांचे हित जोपासले आहे. कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा विश्वास कारखान्याने संपादन केला असून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे. कारखान्याच्या ९ हजार मे. टन क्षमतेच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, अत्यंत अवघड परिस्थितीतही यावर्षी ११ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

यावर्षीचा दुष्काळ अत्यंत अवघड आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून रब्बी हंगाम होण्याचीही शक्यता कमी आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमजुरांना काम मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी पशुधन हे लक्ष्मीचे रूप आहे; मात्र त्यांची होणारी हालअपेष्टा पाहवत नाही. शासनाने पंचनाम्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा न करता तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. राज्यातील शेतकरी व शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी रोजगार हमीची कामे, चारा छावण्या याबाबत तातडीने निर्णय झाले पाहिजेत, अशी मागणी थोरात यांनी केली. सरकारकडे पैसा असूनही जनता उपाशी ठेवण्याची वेळ आली आहे. साध्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनाही पैसे मिळत नसल्याची वाईट अवस्था आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
यावर्षीचा दुष्काळ हे कोरोनाप्रमाणे मोठे संकट आहे. मात्र काटकसर आणि मेहनतीच्या जोरावर या संकटातून मार्ग काढत सर्वांची दिवाळी आनंदात करणार आहोत. कार्यक्षेत्रामध्ये हक्काचा ऊस वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कारखान्याकडून यावर्षीही ऊस उत्पादकांना चांगला भाव दिला जाणार असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. अशा संकटाच्या काळात शासनाने साखर कारखानदारीसह शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविकात कारखान्याने सभासद, शेतकरी तसेच कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. ऑफ-सीझन काळात कारखान्याची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात आली असून कारखान्याच्या विस्तारीकरणाचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले. यावेळी सभासद, ऊस उत्पादक, कामगार तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायमच सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी व कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीनिमित्त कारखान्यातील कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.



