गोदावरी कालव्यांना २० नोव्हेंबरपूर्वी आवर्तन सोडा- आ. आशुतोष काळेंची जलसंपदामंत्री ना. विखे पाटलांकडे मागणी
गोदावरी कालव्यांना २० नोव्हेंबरपूर्वी आवर्तन सोडा- आ. आशुतोष काळेंची जलसंपदामंत्री ना. विखे पाटलांकडे मागणी
- गोदावरी कालव्यांना २० नोव्हेंबरपूर्वी आवर्तन सोडा- आ. आशुतोष काळेंची जलसंपदामंत्री ना. विखे पाटलांकडे मागणी

Kopargaon vijay kapse दि ५ नोव्हेंबर २०२६– राज्यासह कोपरगाव मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी संपत आले आहे. तसेच चारा पिकांना आणि रब्बी हंगामातील पिकांना देखील पाण्याची आवश्यकता भासत असल्यामुळे गोदावरी कालव्यांना २० नोव्हेंबरच्या आत आवर्तन सोडावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदानाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हंटले आहे कि, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गोदावरी कालव्यांना रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १ डिसेंबरला सोडण्याचा निर्णय झाला आहे. परंतु गोदावरी कालव्यांच्या लाभ क्षेत्रात कमी पर्जन्यमानामुळे नागरिकांचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. याच बरोबर पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांच्या साठवण तलावांनी तळ गाठल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांनी देखील तळ गाठल्यामुळे नागरिकांना सहा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. तसेच मिळणाऱ्या आवर्तनाच्या भरवशावर लाभ धारक शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची व चारा पिकांची लागवड केली असून या पिकांना जर वेळेत पाणी मिळाले नाही तर त्यांचे देखील भवितव्य खरीप पिकांप्रमाणे धोक्यात येऊ शकते. कमी पर्जन्यमानामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली असल्याने विहिरी आणि बोअरवेल मधून पाणी उपलब्ध होईल या अपेक्षा संपल्यात जमा आहे.

त्यामुळे एकूण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून १ डिसेंबरची वाट न पाहता २० नोव्हेंबरपूर्वीच गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे



