संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा राष्ट्रीय स्तरावर दुहेरी सन्मान

संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा राष्ट्रीय स्तरावर दुहेरी सन्मान
गोव्यात आयएसटीईचे दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ आणि ‘बेस्ट इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम’ पुरस्कारावर कोरले नाव
Sangmner vijay kapse दि १६ नोव्हेंबर २०२६: अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, नवोपक्रम आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई), नवी दिल्ली यांच्या वतीने महाविद्यालयाला जाहीर झालेले ‘उत्कृष्ट हरित परिसर’ (बेस्ट ग्रीन कॅम्पस) आणि ‘उत्कृष्ट नवोपक्रम व स्टार्टअप परिसंस्था’ (बेस्ट इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम) हे दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार २ नोव्हेंबर २०२६ रोजी गोवा येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले.

विशेष म्हणजे, यापूर्वी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातही महाविद्यालयाला आयएसटीईचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सलग दोन शैक्षणिक वर्षांत आयएसटीईचे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र व गोवा विभागातील अमृतवाहिनी हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे.

गोव्यातील हॉटेल रोनिल जेडी हयात येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात टेक्नो इंडिया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सैकत मैत्रा, आयएसटीईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, महाराष्ट्र-गोवा विभागाचे अध्यक्ष प्रा. (डॉ.) रणजित सावंत, सचिव प्रा. के. पी. कुंभार आणि आयएसटीईचे कार्यकारी सचिव डॉ. एस. एम. अली यांच्या हस्ते महाविद्यालयाला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या राष्ट्रीय सन्मानानिमित्त महाविद्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त व सचिव शरयूताई देशमुख, विश्वस्त अनिल शिंदे आणि मॅनेजर व्ही. बी. धुमाळ यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, ग्रीन कॅम्पस प्रस्तावाचे समन्वयक डॉ. एस. बी. कांडेकर, इन्क्युबेशन सेंटरचे प्रमुख डॉ. डी. एस. बजाज आणि आयएसटीई समन्वयक डॉ. एम. ए. वाकचौरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

नॅककडून ‘A+’ श्रेणी, पाच वेळा एनबीए मान्यता आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी कायमस्वरूपी संलग्नता अशी शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या या दुहेरी राष्ट्रीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त शरयूताई देशमुख, प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. या यशाबद्दल संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शैक्षणिक बीजाचा समृद्ध वटवृक्ष झाला!
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी रोवलेल्या शैक्षणिक बीजाचा आज समृद्ध वटवृक्षात विस्तार झाला आहे. आयएसटीईच्या माध्यमातून मिळालेले हे दोन राष्ट्रीय पुरस्कार संपूर्ण अमृतवाहिनी परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्यात नवसंशोधन, उद्योजकीय दृष्टिकोन आणि निसर्गसंवर्धनाची जाणीव रुजविण्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अविरत परिश्रमांचे हे फलित आहे.
– शरयू देशमुख, व्यवस्थापकीय विश्वस्त



