वारीत टेके पाटील ट्रस्टच्यावतीने प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे व्याख्यान
मुलांनो, व्यसन करायचेच असेल तर कर्तृत्वाचे करा!’
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि ४ जुलै २०२६ : “दोन तासात उतरणारे गुटखा, मावा किंवा दारूचे व्यसन नामर्द करतात. तरुणानो, जर तुम्हाला खरोखरच व्यसन करायचे असेल, तर ते कर्तृत्वाचे आणि अंगावर वर्दी आणण्याचे करा. ज्या रस्त्यावरून तुमचा बाप फाटके कपडे घालून तुमच्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत होता, त्याच रस्त्यावर आणि चौकात तुमच्या बापाने ताठ मानेने ‘माझे पोरगं क्लास वन अधिकारी झाले आहे’ असे छाती ठोकून सांगितले पाहिजे, हे खरे व्यसन अंगात बाणा,” असे परखड आणि प्रेरणादायी आवाहन प्रसिद्ध युवा प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी केले.
जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने ग्रामपंचायत सदस्य राहुल (दादा) टेके पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ सोमैय्या विद्यामंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय व श्री रामेश्वर विद्यालय येथील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना “न समजलेले आईबाप समजून घेताना” या विषयावर गुरुवारी (दि.2) सोमैय्या विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे कामगार अधिकारी संजय कराळे होते.जाहिरात
यावेळी व्यासपीठावर कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके, माजी ग्रा.पं.सदस्य मधुकर टेके, गोरख टेके, ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टेके, माजी उपसरपंच रामदास सोनवणे, बाबासाहेब शिंदे, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र ललवाणी, सोमैय्या विद्यामंदिरच्या प्राचार्य डॉ. सुनिता पारे, पर्यवेक्षक संजय गडकर, रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शरीफ शेख, कैलास शेळके, भागवताचार्य ह.भ.प. सुरेखाताई टेके महाराज, ह.भ.प. विनायक टेके महाराज ह.भ.प. डॉ. सर्जेराव टेके महाराज, ह.भ.प. शंकर गोंडे महाराज, शिवव्याख्याते विजय नवले, सामाजिक कार्यकर्ते दिनेश निकम, वसंतराव गोरे, मराठी पत्रकार परिषदेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष अरुण कदम, प्रसिद्धी प्रमुख भागिनाथ गायकवाड उपस्थित होते.
दरम्यान आपल्या घणाघाती आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीत बोलताना वसंत हंकारे यांनी आजच्या तरुण पिढीच्या व्यसनाधीनतेवर आणि बदलत्या जीवनशैलीवर तीव्र बोट ठेवले. ते पुढे म्हणाले, “आजच्या तरुणांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव राहिलेली नाही. सोन्यासारखा बाप स्वतः उपाशी राहून, पोटाला चिमटा काढून पोरांच्या शाळेची फी भरतो. पोरांनी मागितली १०० ची नोट तर हळूच ५०० रुपये हातावर ठेवतो. अशा कष्टकरी बापाचे अश्रू आणि कष्ट जर तुम्हाला पाहायचे असतील, तर कधीतरी रात्री दोन वाजता उठून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा बाप तुमच्या भविष्यासाठी किती झिजतो आहे. मुलींना आवाहन करताना म्हणाले मुलींनो तुमचा बाप दिवस-रात्र तुमच्याच चांगल्या भविष्याचा विचार करत असतो परंतु तुम्ही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून स्वतःचेही आयुष्य बरबाद करून घेतात आणि तुमच्या जन्मदात्या आई बापाला ही जिवंतपणी मरण यातना देतात हे करू नका तुमच्या आई बापाला त्यांच्या हाताने तुमचं कन्यादान करू द्या. समाजात ताट मानाने जगू द्या. त्याचबरोबर”जोपर्यंत एकही पोरगं व्यसनमुक्त होत नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. मोबाईलच्या आभासी दुनियेतून बाहेर पडून आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तरुणांनी अहोरात्र अभ्यास आणि मेहनत केली पाहिजे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.
या व्याख्यानाला परिसरातील युवक, विद्यार्थी, पालक, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंत हंकारे सरांच्या या संवादामुळे उपस्थित विद्यार्थी, पालक, महिला, तरुणांच्या डोळ्यात अश्रू आले, तर अनेकांनी जागेवरच कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला स्पर्श न करण्याचा आणि केवळ कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करण्याचा ठाम निर्धार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव टेके व विनायक टेके यांनी केले तर गोरख टेके यांनी आभार मानले.जाहिरात