पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांचे आतील तापमान नियंत्रणात आणण्यासाठी पाचट टाकावेत
पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांचे आतील तापमान नियंत्रणात आणण्यासाठी पाचट टाकावेत
निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या सूचना
शिर्डी प्रतिनिधी दि २ मे २०२४ – उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांचे आतील तापमान नियंत्रणात आणण्यासाठी अशा मतदान केंद्रांच्या छतावर १० मे पूर्वी पाचट टाकण्यात यावेत. अशा सूचना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिल्या आहेत.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. यात एकूण १७०८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सद्यस्थितीमध्ये उष्णतेची लाट आहे. त्यामुळे ज्या मतदान केंद्रावर पत्र्याचे छत आहे. अशा केंद्रावर काम करणारे कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळून सुसह्य वाटावे, तसेच व्हीव्हीपॅट मशिन अतिसंवेदनशील असल्याने वाढत्या तापमानामुळे या यंत्रात बिघाड होऊ याची दक्षता घेणेही गरजेचे आहे. तेव्हा पत्र्याचे छत असलेल्या मतदान केंद्रांच्या आतील तापमान कमी करण्याच्या अनुषंगाने अशा छतांवर उसाचे पाचट/गवत/ज्वारी/ बाजरीचे तडस टाकण्याचे काम १० मे पूर्वी करण्यात यावे. तसेच छतांवर टाकलेले पाचट/गवत/तडस जोराचा वारा आला तर उडून जावू नये, अशा तऱ्हेने पक्के बांधून ठेवण्याची दक्षता घ्यावी.
शिर्डी लोकसभेच्या सर्व विधानसभा मतदार संघातील सर्व तालुक्यात ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, सेक्टर ऑफीसर यांनी संयुक्तपणे व समन्वयाने प्रथम प्राधान्याने तात्काळ आपल्या गावातील पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्राच्या छतावर उसाचे पाचट/गवत/ज्वारी/बाजरीचे तडस टाकण्याचे काम मुदतीत पूर्ण करावे. यासर्व कामांवर संनियंत्रण विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ठेवावे. याबाबत वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उलट टपाली शिर्डी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास सादर करावा. सदर बाब ही निवडणुकीसंबंधी व अत्यंत महत्वाची असल्याने हयगय अथवा विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही श्री.कोळेकर यांनी दिले आहेत.