पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करत ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजुर करावे
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना नितीन औताडे यांनी निवेदन देत केली मागणी
कोपरगाव विजय कापसे दि ११ जुन २०२४– कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव-येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत एकूण २२ गावांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते. परिसरातील एकूण लोकसंख्या जवळपास ५० हजारांच्या आसपास आहे. शेतकरी व सर्वसामान्यांच्या दृष्टिने या आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हायला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे अहमदनगर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली आहे.
शिर्डी लोकसभेचे माजी खा.सदाशिवराव लोखंडे यांच्यासमवेत त्यांनी आरोग्य मंत्री सावंत यांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्याची ग्रामीण भागाची लोकसंख्या २,३८, ४२७ असुन सदयस्थितीत कोपरगाव तालुक्यात ६ प्राथमिक आरोग्य केंद्र (चासनळी, दहेगाव, पोहेगाव, संवत्सर, टाकळी ब्राम्हणगाव, वारी) कार्यान्वित आहेत. व माहेगाव देशमुख येथे नव्यानेच प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधुन झालेली असुन अदयाप पदनिर्मिती न झाल्याने कार्यान्वित करण्यात आलेली नाही.
पोहेगाव हे गाव तालुक्याच्या ठिकाणापासुन १५ कि.मी.अंतरावर आहे.सदयस्थितीत पोहेगाव व पोहेगाव परिसरातील एकुण २२ गावांची लोकसंख्या जवळपास ४९४२९ इतकी आहे. सदर गावापासुन ग्रामीण रुग्णालय कोपरगाव हेच एकमेव संदर्भ सेवा ठिकाण आहे. ज्यापर्यंत पोहचण्यासाठी रुग्णांना ३० मिनीटांचे अंतर पार करावे लागते. तसेच जिल्हा रुग्णालय अहमदनगर हे १०० कि.मी.अंतर आहे. तसेच पोहेगाव हे गाव अहमदनगर जिल्हा तसेच कोपरगाव तालुका यांच्या दक्षिण बाजुस आहे. सदर गावाचे दळणवळण हे कोपरगाव तालुक्यातील २२ गावे तसेच सिन्नर तालुक्यातील ३ गावे यांचेशी दैनंदिन संपर्कात आहेत. पोहेगाव हे तालुक्यातील प्रमुख बागायती गाव व बाजारपेठ आहे. तसेच पोहेगाव हे गाव कोपरगाव- संगमनेर या महामार्गावर स्थित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पोहेगाव अंतर्गत काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. यामुळे येथे दैनंदिन येणाच्या नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
नव्यानेच मौजे सोनेवाडी येथे एम.आ.डी.सी. निर्मितीबाबत प्रस्ताव मंजुर झालेला असुन ती लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे येथे येणाऱ्या नागरीकांच्या व कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोहेगाव येथे ग्रामीण रुग्णालय मंजुर झाल्यास नागरीकांना आरोग्यसेवा मिळणे सहज शक्य होणार आहे. सदयस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र पोहेगाव येथे ९० ते १०० बाहयरुग्ण तपासणी होते. दरमहा २० ते २५ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया होतात. ग्रामीण रुग्णालयात सदयस्थितीत जे काम अपेक्षित आहे ते सदयस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात होत आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत छोटी असल्याने व मनुष्यबळ अपुरे असल्याने ग्रामस्थांची मागणी असतानाही २४ X ७ सेवा देणे कठीण होत आहे.मौजे पोहेगाव येथे ग्रामीण रुग्णालय मंजुर झाल्यास परिसरातील २५ गावातील जवळपास ७० ते ८० हजार नागरीकांना आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार असुन उपचारासाठी त्यांना कोपरगाव येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तेव्हा पोहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजुर करण्यात यावे अशी मागणी नितिनराव औताडे यांनी केली आहे.