विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने मुख्यकार्यकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन
महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने दिले निवेदन
कोपरगाव विजय कापसे दि १३ जुलै २०२४– महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने बुधवार दि १० जुलै रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे व अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांची भेट घेऊन जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
ग्रामसेवक संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १०,२० व ३० वर्ष आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पात्र ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांना त्वरित लाभ देण्यात यावा, सेवा जेष्ठता यादी महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठता विनियम )नियमावली १९८२,३ (अ ) विनिमयानुसार अक्षर निकाली काढून अद्यावत करण्यात यावे,१ नोव्हेंबर २००५ जाहिरात अधिसूचना निवड प्रक्रिया पूर्ण केलेल्या व तदनंतर रुजू झालेल्या संवर्ग बांधवांना वित्त विभागाकडील शासन निर्णय व इतर जिल्हा परिषदेने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे लाभ देण्यात यावा, जिल्हा परिषद स्तरावर तालुका निहाय गोपनीय अहवाल संचिका ठेवण्यात यावी, ग्राम विकास अधिकारी व विस्तार अधिकारी रिक्त पदाची पदोन्नती होणे बाबत, कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत नाटेगाव येथील ग्रामसेविका यांच्यावर अन्यायकारक झालेल्या गौण खनिज दंडात्मक कारवाई बाबत, निलंबित ग्रामसेवकांना पदस्थापना देणे बाबत, ग्रामसेवक संवर्गावर वैयक्तिक द्वेष भावनेतून होणाऱ्या खोटा तक्रारीचे निरसन करणे बाबत ,संगणक परिचालक ऑनलाइन कामकाज व अडीअडचणी व पंचसूत्री कार्यक्रम अंमलबजावणी बाबत आदी मागण्यांबाबत सविस्तर विषयनिहाय निवेदनावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रां. पं.) यांच्या सोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत चर्चा केली.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे राज्याचे सचिव राज हरिश्चंद्र काळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील राजपूत, जिल्हा सचिव शशिकांत नरोडे, सुरेश सौदागर, बळीराम सेटवाड, शरदभाऊ गायकवाड, कृष्णदास अहिरे, किरण राठोड आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.