संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेजचा २४ वा स्थापना दिवस संपन्न
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेजचा २४ वा स्थापना दिवस संपन्न
आयुष्याची खरी जडणघडण दर्जेदार शिक्षण संस्थेत मिळते उपशिक्षणाधिकारी किरण वागसकर
कोपरगांव विजय कापसे दि ५ ऑगस्ट २०२४:‘मी श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी या खेडेगावातील. २००२ साली येथील सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि माझ्या आयुष्याला आकार मिळत गेला. शिस्त , वेळेवर अभ्यास, वेळेवरच खेळ, सर्व काही ठराविक वेळेलाच. यामुळे शिस्त लागली. येथे लागलेली शिस्त पुढे कायम राहिली, यामुळे मी एमपीएससी परीक्षा उत्तिर्ण होवुुन उपशिक्षणाधिकारी होवु शकलो व याच शिस्तीच्या जोरावर आणि नोकरीत असतानाही वेळ काढून युपीएससी अभ्यास करून आता नुकतीच उपजिल्हाधिकारी म्हणुनही निवड झाली. यावरून संस्था दर्जेदार असेल तर तेथे आयुष्याची जडणघडण हमखास चांगली होते’, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्यााचे उपशिक्षणाधिकारी व नव्याने उपजिल्हाधिकारी म्हणुन निवड झालेले आणि संजीवनी सैनिकी स्कूलचे माजी विद्यार्थी श्री किरण भास्कर वागसकर यांनी केले.
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या २४ व्या स्थापना दिवसाच्या समारंभात विद्यार्थ्यांसमोर वागसकर प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर डायरेक्टर डी. एन.सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, वसतिगृह अधिक्षक विजय भास्कर उपस्थित होते. प्रारंभी काही विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून उत्कृष्ट वत्कृत्व शैलीने मंत्रमुग्ध केले.
श्री वागसकर पुढे म्हणाले की सध्या संस्थेने सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अनुभवी व निष्णात शिक्षक , वेगवेगळ्याा प्रयोगशाळा , स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी योग्य प्रशिक्षक , अशा सर्व बाबींची उपलब्धता व्यवस्थापनाने केली आहे. आमच्या वेळेला इतक्या सोयी नव्हत्या. म्हणुन सध्याच्या विद्यार्थ्यांनी माझ्या पेक्षाही उच्च पदावर जाणे अपेक्षित आहे. येथे शिस्त आहे. मोबाईलचा वापर नाही. परंतु, इ.१२ वी नंतर इतरत्र शिक्षणास गेल्यावर आपणास येथे लागलेली शिस्त कायम ठेवा, नाहीतर मोकळिक मिळाली तर विद्यार्थी वेगळ्या वळणावर जातात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात. एमपीएससी व युपीएससी परीक्षांचे मार्गदर्शनही त्यांनी केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुमित कोल्हे म्हणाले की वागसकर यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे सैनिकी स्कूलवर विशेष प्रेम होते. विद्यार्थ्यांच्या सर्व बाबींची ते चौकशी करीत असे. त्यांनी घालुन दिलेले मापदंड संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे पाळल्या जात असल्यामुळे स्कूल व ज्युनिअर कॉलेजची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. येथील शिक्षकही विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी झोकून देतात. सैनिकी स्कूलच्या २४ वर्षांच्या प्रदिर्घ प्रवासात अनेक विद्यार्थी येथे घडले. अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर आहेत. या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचे सुतोवाचही श्री सुमित कोल्हे यांनी केले.
प्राचार्य कैलास दरेकर यांनी सांगीतले की श्री वागसकर यांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा आम्हाला आनंद होत आहे. . सध्याच्या विद्यार्थ्यानीही भविष्यात मोठ्या पदावर जावुन आम्हाला सत्काराची संधी द्यावी, असे सांगुन आभार मानले.