विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकले गेले पाहिजे-माजी नगराध्यक्ष वहाडणे
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवत केली मागणी

कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२४–आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाचे अनेक सन्माननीय जेष्ठ नेते-पदाधिकारी यांचे महाराष्ट्रभर संपर्क अभियान सुरू आहे.भाजपा कार्यकर्त्यांचे मोठमोठे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. संबोधन-प्रबोधन करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने प्रचारयंत्रणा राबविली पाहिजे.सर्वांनी पक्षासाठी झोकून देऊन काम केले पाहिजे असे विचार मांडून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व प्रयत्न अत्यंत उपयुक्तच आहेत यात शंका नाही.पण वर्षानुवर्षे निष्ठेने भाजपाचे काम करणाऱ्या जुन्या-जेष्ठ कार्यकर्त्यांना फारसे विचारात घेतले जात नाही.त्यांचे म्हणणे ऐकलेही जात नसल्याने त्यांच्यात मोठा असंतोष-नाराजी हे सर्वत्र जाणवते.त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसावे असे वाटते. निष्ठावंत कार्यकर्ते पक्षविरोधी काम करणार नाहीतच,पण तेच कार्यकर्ते मनापासून कार्यरत झाले नाहीतर पक्षाची हानी होणारच हेही सत्य नाकारून चालणार नाही.

म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रभर अभियान राबवून जुन्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकले गेले पाहिजे. जर तसे झाले नाही तर कार्यकर्त्यांच्या मनात साठलेला असंतोष ऐन आगामी विधानसभा निवडणुकीत उफाळून आला तर अवघड होईल. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनातील नाराजी-असंतोष जाणून घ्यायला हरकत नसावी अशी विनंती कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भजपाचे जेष्ठ निष्ठावंत नेते विजय वहाडणे यांनी भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवत केली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, अनेक निष्ठावंत जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मी मांडतोय. कार्यकर्त्यांना मनातील भावना मांडण्याची संधी द्यावी. ऐकून घेण्यात नुकसान काहीच नाही.कार्यकर्त्यांच्या निष्ठेची जाणीव ठेवून त्यांना व्यक्त होऊ द्यावे.पक्षाकडून – नेत्यांकडून कार्यकर्त्यांना सातत्याने एकतर्फी मार्गदर्शन व सूचना चालूच असतात. पण कार्यकर्त्यांनी कुणासमोर आपल्या व्यथा-मनोगत मांडायच्या हाच प्रश्न आहे.म्हणूनच आपण या पत्राची दखल घ्यावी अशी विनंती कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे निष्ठावंत जुने जाणते नेते विजय सूर्यभान वहाडणे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
