केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींची आ. आशुतोष काळेंनी भेट घेत झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता दर्जोन्नती करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची केली मागणी
केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींची आ. आशुतोष काळेंनी भेट घेत झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता दर्जोन्नती करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची केली मागणी
केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींची आ. आशुतोष काळेंनी भेट घेत झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता दर्जोन्नती करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची केली मागणी
कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑगस्ट २०२४ :- आ. आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे जावून नुकतीच केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. कोपरगाव मतदारसंघातील झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता (राज्य मार्ग ६५) ची दर्जोन्नती करुन हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात यावा अशी लेखी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी आ. आशुतोष काळे यांनी झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता अर्थात राज्यमार्ग ६५ बाबत मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करतांना त्यांनी कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता अर्थात राज्यमार्ग ६५ अत्यंत महत्वाचा आहे. या रस्त्यावर बाराही महिने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. यामध्ये जड वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कोपरगाव मतदार संघाच्या लगतच जगप्रसिद्ध शिर्डीचे श्री साईबाबा देवस्थान असून या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रम व उत्सव सुरु असतात. त्या उत्सवा वेळी एन.एच.७५२ जी वरून शिर्डीकडे जाणारी वाहतूक पुणतांबा फाटा मार्गे याच झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता अर्थात राज्यमार्ग ६५ वरून मागील अनेक वर्षापासून वळविली जाते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असल्यामुळे या रस्त्याची वारंवार दुरुस्ती करूनही हा रस्ता खराब होत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी ना.नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.
झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्त्याच्या लगतच एन.एच.१६० व समृद्धी महामार्ग असून त्या मार्गाची समस्या कायमची मिटली आहे. परंतु राज्य मार्ग ६५ वरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे या मार्गाचे मजबुतीकरण व रुंदीकरण होणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात यावा अशी आग्रही मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या एन.एच.७५२ जी च्या सावळीविहीर फाटा ते येवला नाका मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्या स्तरावर सूचना कराव्यात अशी विनंती आ.आशुतोष काळे यांनी केली आहे. मंत्री ना. नितीन गडकरी यांनी झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता (राज्य मार्ग ६५) ची दर्जोन्नती करुन हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे बाबत सविस्तरपणे जाणून घेवून सकारात्मक प्रतिसाद देत त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करू अशी ग्वाही दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
ज्यावेळी सिन्नर- शिर्डी ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.१६० मंजूर होवून सावळीविहीर फाटा ते सेंधवा (म.प्र.) पर्यंत या मार्गाला (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.७५२ जी असा क्रमांक देण्यात आला त्यावेळी एन.एच.१६० साठी निधीची तरतूद करण्यात आली मात्र एन.एच.७५२ जी साठी निधीची तरतूद करण्यात आली नव्हती. कारण हा मार्ग राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत झालेला नव्हता. त्यावेळी देखील आ.आशुतोष काळे यांनी ना.नितीन गडकरी यांची भेट एन.एच. ७५२ जी महामार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करून निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून सावळीविहीर फाटा ते येवला नाका या मार्गासाठी ना.नितीन गडकरी यांनी १९१ कोटी निधी दिला. त्यामुळे एन.एच. ७५२ जी चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. राज्य मार्ग ६५ ची दर्जोन्नती करून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यासाठी आ.आशुतोष काळेंनी उचलेले पाऊल स्वागतार्ह असून त्यामुळे या मार्गावरची वाहतुकीची समस्या कायमची मार्गी लागून मतदार संघातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने त्याचा मोठा फायदा होणार आहे.