ओगदी जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थिनींची इस्रो सहलीसाठी निवड
ओगदी जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थिनींची इस्रो सहलीसाठी निवड
सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन
कोपरगाव विजय कापसे दि १२सप्टेंबर २०२४— अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित थुंबा केरळ येथील डॉ विक्रम साराभाई स्पेस सेंटर या शैक्षणिक सहलीकरता जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील ओगदी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलींची निवड झाल्याने नक्कीच हा ओगदी गावच्या तसेच संपूर्ण कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या नियोजनातून व मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका शिक्षण विभाग नेहमीच अव्वल ठरला असून शिक्षण विभागाचे काम देखील अत्यंत उत्कृष्टपणे सुरू असून त्याचाच प्रत्यय आज तालुक्यातील ओगदी जिल्हा परिषद शाळेतील अनन्या वाल्मीक बागल व गीता दशरथ जोरवर या दोन विद्यार्थिनींची जिल्हा गुणवत्ता यादीतून सहलीसाठी निवड झाली असून त्या लवकरच थुंबा केरळ येथील डॉ विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे जाऊन शास्त्रज्ञ काम कसे करतात, अवकाश संशोधनात करिअर कसे करावे आदि अवकाश संबंधी तसेच वैज्ञानिक तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेणार असून यातून त्यांचात भविष्यात शास्त्रज्ञ होण्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार असून विज्ञानात गोडी देखील वाढणार आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींच्या निवडीबद्दल दोघींचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ओगदी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील टोरपे, शिक्षक बाबासाहेब गुंजाळ, ज्योती दूशिंग, पष्पा बिऱ्हाडे, संदीप राऊत या सर्व शिक्षकाचे व विद्यार्थीनीच्या पालकांचे कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख संजय महानुभव आदींसह शिक्षण प्रेमी नागरिक व ओगदी गावच्या ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.