मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे-आ.आशुतोष काळे
मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे-आ.आशुतोष काळे
कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अॅण्ड प्रेसिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १८ सप्टेंबर २०२४:-कोपरगाव मतदार संघाचा पाच वर्षात न भूतो न भविष्यती विकास करतांना मतदार संघातील रस्ते, पाणी, वीज, समाज मंदिर, देवस्थान अशी सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणारी विकासकामे पूर्ण करतांना ३००० कोटी निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी आपल्या शिलेदारांना दिल्या आहेत.
कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अॅण्ड प्रेसिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या सभागृहात संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना आ. आशुतोष काळे बोलत होते. अध्यक्षपदाची सूचना नानासाहेब चौधरी यांनी मांडली. त्यास संदिप शिंदे यांनी अनुमोदन दिले. संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर सुरेश काशीद यांनी केले.
पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघासह शहरातील सुज्ञ मतदारांनी ज्या विश्वासाने विकासाची जबाबदारी सोपविली ती जबाबदारी पार पाडतांना मतदार संघाच्या आजवरच्या इतिहासात कुणालाही जे जमले नाही ते ३००० कोटीपेक्षा जास्त निधी आणण्याचे काम करून दाखविले आहे. झालेल्या विकासातून सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कोपरगाव शहराची तहान भागविण्यासाठी पाच नंबर साठवण तलाव सज्ज झाला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरासह मतदार संघातील नागरिकांमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण आहे. विकास हा नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मताधिक्य वाढविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे आपले दैनंदिन कर्तव्य पूर्ण करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य वाढविण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सुरु केलेल्या सहकारी संस्था प्रतिकूल परिस्थिती सुरु राहतील यासाठी मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे व्यवसाय सुरू करून संस्था प्रगतीपथावर ठेवल्या. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने मोलाचे सहकार्य करून संस्था प्रगतीपथावर ठेवल्या आहेत. त्यामुळे संस्थेचे मॅनेजर व कर्मचारी व संस्थेवर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांना आधार मिळाला आहे. ज्याप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे यांनी कठीण परिस्थितीत संस्था टिकवली, वाढवली त्याप्रमाणे सर्व सहकारी संस्था प्रगतीपथावर ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. सभासदांच्या वतीने विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यासाठी संचालक अशोकराव मुरलीधर काळे यांनी सूचना मांडली. त्यास सभासद शिवाजी देवकर यांनी अनुमोदन दिले. संस्थेचे संचालक महेश लोंढे यांनी निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. गुलाब शेख यांनी सूत्रसंचालन केले. तर संचालक संजय संवत्सरकर यांनी आभार मानले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक, उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी व जिनिंग प्रेसिंग संस्थेचे संचालक, सभासद उपस्थित होते.