रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश काळे यांची सेवापूर्ती
रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश काळे यांची सेवापूर्ती
रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश काळे यांची सेवापूर्ती
कोपरगाव विजय कापसे दि १ ऑक्टोबर २०२४– कोपरगाव येथील सोमैया महाविद्यालयामध्ये गेल्या ५०-६० वर्षांमध्ये प्रा.ना.स.फरांदे, डॉ. गुळगुळे, प्रा. घैसास आदी अनेक विद्वान आणि नामवंत प्राध्यापक होऊन गेलेत, ज्यांच्यामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक झाला. विज्ञान शाखेचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश काळे याच परंपरेतील एक अभ्यासू आणि कष्टाळू प्राध्यापक होत. त्यांच्या रूपाने विज्ञान शाखेचा पहिला प्राध्यापक आज निवृत्त होत आहे. आज नावारूपास आलेली विज्ञान शाखा उभी करण्यात काळे सरांचे योगदान मोठे आहे”, असे प्रतिपादन को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश काळे यांच्या सेवापूर्ती समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी डॉ. काळे सर यांचा संस्था व महाविद्यालयाच्या वतीने सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. समारंभाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. सी. ठाणगे यांनी प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त केले. डॉ. ठाणगे म्हणाले की रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश काळे सर यांनी सोमैया महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. विज्ञान शाखेच्या विकासासाठी काळे सरांनी केलेले योगदान कदापी विसरता येणार नाही.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी इतिहास विभाग प्रमुख व अखिल भारतीय प्राध्यापक संघटनेचे नेते डॉ. के. एल. गिरमकर यांचे तसेच डॉ. बापूसाहेब भोसले, प्रा. भाऊसाहेब होन, संवत्सर येथील ग्रामस्थ श्री. परजणे आदींनीही मनोगत व्यक्त करत डॉ. काळे सरांच्या योगदानावर प्रकाशझोत टाकत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. वाणिज्य विभागाचे डॉ. रवींद्र जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तर इंग्रजी विभागाचे डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. नवनाथ दळवी, गणेश निरगुडे रोहित लकारे किरण गांगुर्डे आदींनी विशेष परिश्रम घेतले.