पंचवीस हजार युवकांच्या अन्नात माती कालवणारे आ.काळे यांना रोजगारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही – दिपक चौधरी
अवैध धंद्यांचा रोजगार वाढविणारे आ.काळे यांनी संजीवनी रोजगार मेळाव्यावर बोलणे हास्यास्पद
कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑक्टोबर २०२४– संजीवनी नोकरी महोत्सवामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी आपले रोजगारासाठी योगदान काय याचा विचार करावा. हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे मात्र काळे कुटुंबाने आजवर किती रोजगार तालुक्यात आणला हे जनतेसमोर मांडावे. त्यांच्या निगडित संस्थेत परराज्यातील मजूर आणून स्थानिकांचा रोजगार देखील त्यांनी घालवला आहे. आमदार काळे यांनी तालुक्यात होणारी स्मार्ट सिटी होऊ न देऊन २५ हजार रोजगार घालवण्याचे पाप केले कधीही मिटणार नाही. ज्यांचे तरुणांना रोजगार देण्यासाठी एक टक्का देखील योगदान व नैतिकता नाही त्यांनी रोजगारावर बोलणे म्हणजे बलिशपणाचा कळस आहे अशी बोचरी टीका धारणगावचे दिपक चौधरी यांनी केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर वेड्यात काढण्याचे काम आजवर फक्त काळे यांनी केले. कोल्हे यांनी रोजगार मेळावा घेतला यामुळे तुमचे पोट दुखत असेल तर पाच वर्ष तुम्हाला रोजगार निर्मिती करण्यासाठी कोणी रोखले नव्हते. खोट्या जाहिरातीचे जेवढे फ्लेक्स तालुका भर लावले तेवढ्या जरी युवकांना रोजगार दिला असता तर कार्यकर्त्यांना गोळीबार करण्याची वेळ आली नसती याचे आत्मपरीक्षण करा. गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचा रोजगार वाढीचे काम केले का याचाही शोध त्यांनी घ्यावा.
कोल्हे कुटुंबाने कुठल्याही एका राजकीय पक्षासाठी रोजगार मेळावा घेतला नाही तर तुमच्याही पक्षातील अनेक कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही याचा लाभ झाला आहे कारण हे काम तालुका एक कुटुंब समजून कोल्हे यांनी केले आहे. कुणाचे चांगले झाले तर आमदारांना देखवत नाही हा इतिहास सर्वांना ठाऊक आहे. कोल्हे गटावर टीका करण्याआधी आपल्या सोबत काम करणाऱ्या किती कार्यकर्त्यांच्या कुटुंबात नव्या पिढीला आपण रोजगार दिला याचे आत्मचिंतन करा आणि मग हवेतल्या गप्पा आमदारांनी माराव्या.