कोपरगाव विधानसभा मतदार संघात सोळाशे अधिकारी – कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण
कोपरगाव विधानसभा मतदार संघात सोळाशे अधिकारी – कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण
निवडणूक प्रक्रिया बिनचूक पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया समजून घ्या – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
कोपरगाव विजय कापसे दि २७ ऑक्टोबर २०२४ :- निवडणूक हा लोकशाहीचा सोहळा आहे. या कामामध्ये न्यूनगंड न बाळगता प्रत्येकाने मनापासून सहभागी व्हावे. निवडणूक कर्तव्य बिनचूक पार पाडण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रिया समजावून घ्यावी, असे प्रतिपादन शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आज येथे केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आत्मा मालिक सभागृहात आयोजित निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्राला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत आदी उपस्थित होते.
श्री.कोळेकर म्हणाले, निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मॉक पोल घेतला नाही म्हणजे त्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया संपन्न झाली, असे म्हणता येत नाही. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल घेणे विसरू नये. ईव्हीएम यंत्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक प्रत्येकाने करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. निवडणूक प्रक्रियेतील सर्व फॉर्मच्या माहितीत अचूक ताळमेळ बसला पाहिजे याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ व दुपार असा सत्रात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम सत्रात ८२८ व द्वितीय सत्रात ७४२ असा एकूण १ हजार ५७० अधिकारी – कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.
शिर्डी अपर जिल्हाधिकाऱ्यांची चित्रफीत ठरतेय राज्यासाठी मार्गदर्शक
शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यांची अतिशय सूक्ष्म माहिती देणारी चित्रफीत तयार केली आहे. राज्यातील निवडणूक प्रशिक्षणासाठी ही चित्रफीत अतिशय उपयुक्त व मार्गदर्शक ठरत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनीही या चित्रफीतीत मार्गदर्शन केले आहे. दोन दिवसात ५ हजार ३०० व्यक्तींनी ही चित्रफीत युट्युबवर पाहिली आहे.