गौतमच्या हॉकी संघाला विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये दुहेरी मुकुट
गौतमच्या हॉकी संघाला विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये दुहेरी मुकुट
गौतमच्या हॉकी संघाला विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये दुहेरी मुकुट
कोपरगाव विजय कापसे दि २७ ऑक्टोबर २०२४ :- गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर विभागीय शालेय हॉकी स्पर्धा दि. २६ व २७ ऑक्टोबर रोजी पार पडल्या. ही स्पर्धा १४ व १७ वर्षे वयोगटात खेळवली गेली. या स्पर्धेचे उद्घाटन गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हॉकी प्रशिक्षक व हॉकी महाराष्ट्र संघटनेचे कार्यकारी सदस्य जरार कुरेशी उपस्थित होते.
प्राचार्य नूर शेख यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. हॉकी प्रशिक्षक जरार कुरेशी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडू वृत्तीचे वर्णन करताना नूर शेख सर यांच्या क्रीडा जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या स्पर्धेदरम्यान प्राचार्य नूर शेख यांचे गुरु सांगळे (माजी क्रीडा संचालक संगमनेर महाविद्यालय) यांनी गौतम पब्लिक स्कूलमध्ये सदिच्छा भेट दिली व या स्पर्धा आयोजनाबाबत गौतम पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापन समितीचे कौतुक केले.
हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, सर्व हाऊस मास्टर्स, स्पर्धेसाठी आलेले सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, शाळेचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते. १४ व १७ वर्षे वयोगटातील विभागीय शालेय हॉकी स्पर्धेत पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील मुला मुलींच्या एकूण १८ संघांनी भाग घेतला. गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्ष व १७ वर्षे वयोगटातील हॉकी संघाने स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत स्पर्धा जिंकली व गौतम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पुणे विभागाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला. त्याबद्दल सर्व खेळाडूंचे कौतुक करून संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सदर विभागीय शालेय हॉकी स्पर्धेकरिता शाळेत दाखल झालेल्या मुला-मुलींच्या संघांची जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. दरवर्षी शाळेमध्ये विविध खेळांच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभागीय राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले जाते.गौतम पब्लिक स्कूलच्या दोन्ही विजयी हॉकी संघाचे संस्थेचे चेअरमन मा.आ.अअशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.