के जे सोमय्या कॉलेज

भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

रवी राजमाने, विठ्ठल खिलारी, महादेव माने, ऐश्वर्य पाटेकर, तान्हाजी बोऱ्हाडे, डॉ. देविदास तारू यांना भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

जाहिरात देवकर

कोपरगाव विजय कापसे दि २८ नोव्हेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील  पोहेगाव  येथील भी.ग रोहमारे ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये रवी राजमाने (येळावी, सांगली) विठ्ठल खिलारी (शेनवडी, सातारा) महादेव माने (खंडोबाची वाडी, सांगली) ऐश्वर्य पाटेकर (नाशिक), तान्हाजी बोऱ्हाडे (कानसे, पुणे)  व डॉ.  देविदास तारू (नांदेड) या लेखकांचा समावेश आहे अशी माहिती भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे यांनी येथे दिली. याप्रसंगी ट्रस्टी  रमेशराव रोहमारे,  संदीप रोहमारे,  अॅड्. राहुल रोहमारे व प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे उपस्थित होते.

जाहिरात देवकर

भि. ग.  रोहमारे ट्रस्ट तर्फे १९८९ पासून महाराष्ट्र पातळीवर ग्रामीण साहित्यातील कादंबरी,  कथासंग्रह, कविता संग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार  देण्यात येतात. यावर्षी २०२३ या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

जाहिरात लकारे

 

१. मव्हटी – रवी राजमाने (ग्रामीण कादंबरी,दर्या प्रकाशन, पुणे) विभागून
२. सवळा – विठ्ठल खिलारी (ग्रामीण कादंबरी,दर्या प्रकाशन, पुणे) विभागून
३. वसप – महादेव माने (ग्रामीण कथासंग्रह,ग्रंथाली प्रकाशन, माहीम, मुंबई)
४. कासरा – ऐश्वर्य पाटेकर (ग्रामीण कविता संग्रह, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई) विभागून
५. जळताना भुई पायतळी – तानाजी बोऱ्हाडे (ग्रामीण कविता संग्रह, काव्यग्रह प्रकाशन, वाशिम) विभागून
६. आता मव्हं काय – डॉ. देविदास तारू (ग्रामीण आत्मकथन, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे)

 

जाहिरात लहिरे

     प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी  १५ हजार रुपये रोख,  स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे यावर्षी कादंबरी या व कविता संग्रह या साहित्यप्रकारातील ग्रंथांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ट्रस्टकडे आलेल्या एकूण ६० साहित्यकृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य डॉ. शिरीष लांडगे,  लक्ष्मण बारहाते, डॉ. विजय ठाणगे, डॉ.  जिभाऊ मोरे व डॉ. गणेश देशमुख यांच्या संयुक्त निवड समितीने केले.

जाहिरात निखाडे

             वरील ग्रंथांशिवाय निवड समितीने जखडण (भीमराव वाघचौरे), ओवाळणी (हरिश्चंद्र पाटील), बयनामा (बा.बा. कोटंबे),  हंबरवाटा (संतोष आळंजकर), काळजाचा नितळ तळ(भीमराव धुळुबुळू), पांडुरंगाच्या देशा(डॉ. सदानंद भोसले), ग्रामीण साहित्य चळवळ (डॉ. वासुदेव मुलाटे) या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून विशेष निर्देश केला आहे.

जाहिरात जगताप

पुरस्कृत ग्रंथांबद्दल निवड समितीने म्हटले आहे की “वहिवाटीची वाट कधी कधी शेतकऱ्यांच्या जगण्यावरच उठत असते.  याच शेतातल्या वाटेसाठी अनेक पिढ्या कोर्टकचेऱ्या करतात. खून, मारामाऱ्या करतात. प्रशासनही या प्रकारात सामील असते.  हा सारा गुंता रवी राजमाने यांच्या ‘मव्हटी’ या कादंबरीत चित्रित झाला आहे. तर विठ्ठल खिलारी यांच्या ‘सवळा’ या पहिल्याच कादंबरीत ऊन, पाऊस सहन करत कोयत्याच्या आधारावर भाकरीचा तुकडा शोधणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या मुलाची करुण कथा अत्यंत जिवंत पद्धतीने चित्रीत केलेली आहे.  एकीकडे जगण्यासाठी जीवघेणा संघर्ष आणि दुसरीकडे घेतलेले शिक्षण कुचकामी ठरवणारी भ्रष्ट व्यवस्था याचे प्रत्ययकारी चित्रण वाचकांना खिळवून ठेवते.
‘वसप’ या कथासंग्रहातील महादेव माने यांच्या कथांमध्ये रानशिवारातील शेतकरी शेतमजुरांचे जीवघेणे कष्ट, विवंचना आणि समस्या त्याचबरोबर शेतमजूर आणि पशुपालन जगाच्या सहजीवनाचा तसेच अडचणींचा परिसर बोलीतील हे चित्रण वाचकाचे लक्ष वेधून घेते.

जाहिरात म्हस्के

‘कासरा’ संग्रहाचे कवी ऐश्वर्य पाटेकर यांची कविता ही शेती आणि मातीतून आलेली आहे. हा कवी गाव, माती, गावगाडा, पशु आणि एकूणच शेतकरी जीवनाचे वर्तमान आपल्या परीने तपासतो आणि त्याची यथासांग चिकित्साही  करतो. बकाल खेडी आणि उद्ध्वस्त कृषिजन समूहाचा आलेख मांडणारी पाटेकर यांची कविता वाचकाला अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही. ‘जळताना भुई पायतळी’ कविता संग्रहात बळीचा वंश तगवत ठेवून मुलाच्या हाती नांगराचा फाळ देण्याऐवजी पुढच्या काळाच्या हाका ऐकणारी ही कविता आहे. वास्तवाच्या पार्श्वभूमीवर  ग्रामीण जीवनाच्या दाहकतेचे चित्रण करणारी ही कविता वाचकाला चटका तर लावतेच परंतु त्याचा आशावाद देखील समृद्ध करते. आता मव्हं काय’  होरपळलेल्या बालमनाचे आत्मकथन असणाऱ्या या ग्रंथात श्वास कोंडून ठेवणाऱ्या आणि अपंग व्यवस्थेतून बाहेर पडून कथानायक देविदासने मोठ्या हिमतीने केलेला संघर्ष खरोखरच अचंबित करणाऱ्या आहे.

जाहिरात जोशी

कै. के. बी. रोहमारे यांनी आपल्या वडिलांच्या  स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या भि. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून १९८९ पासून हा उपक्रम राबविण्यात येतो. ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीक्षम मनांना प्रोत्साहन देणे हा यामागील मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे यांनी केले.  सदर पुरस्कार वितरणाचे हे ३५ वे वर्ष असून पुरस्कार योजनेचे ३६ वे वर्ष आहे. आजपर्यंत या पुरस्काराने महाराष्ट्रातील १७७ पेक्षा जास्त लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षीच्या पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध  मराठी कादंबरीकार व समीक्षक  डॉ. राजन गवस व प्रसिद्ध भाषा अभ्यासक तसेच साहित्यिक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांच्या शुभहस्ते व कोपरगावचे माजी आमदार तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. के. बी. रोहमारे यांच्या २७ व्या  स्मृतिदिनी ७ डिसेंबर, २०२४ रोजी सकाळी १० वाजता के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथे केले जाणार आहे.

आभार जाहिरात

या पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास रसिक व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड्. संजीव कुलकर्णी व प्र. प्राचार्य डॉ.  विजय ठाणगे यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे