समता पतसंस्था
कोपरगाव शहरात पहिल्यांदा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन
कोपरगाव शहरात पहिल्यांदा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन
कोपरगाव शहरात पहिल्यांदा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन
कोपरगाव विजय कापसे दि ८ डिसेंबर २०२४ : समता चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेची महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष गिरीश तुळपुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि समता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये बैठक संपन्न झाली. या जिल्हास्तरीय स्पर्धा समता इंटरनॅशनल स्कूलच्या इनडोअर गेम हॉलमध्ये पार पडणार आहेत.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना कोपरगाव कॅरम असोसिएशन अध्यक्ष डॉ.जितेंद्र रणदिवे म्हणाले की, जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी होणार असून या स्पर्धेत फक्त पुरुषांसाठी खुला गट व १८ वर्षाखालील असे दोन गट आहेत. खुल्या गटासाठी पहिले बक्षीस ११ हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये व तिसरे बक्षीस ५ हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र तर चौथे बक्षीस ५ हजार रुपये, पाचवे बक्षीस २ हजार रुपये आणि सहावे बक्षीस १ हजार रुपये रोख ठेवण्यात आलेली आहेत.
१८ वर्षाखालील गटात विजेत्या स्पर्धकांना पहिले बक्षीस ५ हजार रुपये, दुसरे बक्षीस ३ हजार, तिसरे बक्षीस २ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच चौथे बक्षीस १ हजार रुपये, पाचवे व सहावे बक्षीस प्रत्येकी पाचशे रुपये रोख स्वरूपात देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे प्रवेश शुल्क खुल्या गटासाठी ३०० रुपये व १८ वर्षाखालील गटासाठी २०० रुपये आहेत. अधिक माहितीसाठी ८६६९३०३०६३ , ९७६७७४६२६४ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या नियमावली प्रमाणे संपन्न होणार आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत डेसरडा यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रीय स्तरावरील कॅरम खेळाडू अभिजीत तुळपुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या बैठकीला कोपरगाव कॅरम असोसिएशन अध्यक्ष डॉ.जितेंद्र रणदिवे, नितीन सोळके, डॉ. निलेश काबरा, डॉ.निलेश गायकवाड, डॉ.उमेश कोठारी, समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विनोदचंद्र शर्मा, लक्ष्मण जुंजारे, अजित नाईक, आयोजन कमिटीचे सदस्य रोहित महाले, प्रशांत मोरे, पोपट साळवे, विजय घाडगे उपस्थित होते.
कोपरगाव शहरात पहिल्यांदाच जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक शांत, संयमी आणि एकाग्रता या गुणांची वाढ होण्यास मदत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकाधिक कॅरम खेळाडू व कॅरम प्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.डॉ.जितेंद्र रणदिवे, अध्यक्ष