तालुक्याच्या चांगल्या राजकारणाची संस्कृती टिकवायची आहे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
विकासाची वाटचाल आपल्याला कायम ठेवायची आहे; चिंचोलीगुरव, नान्नज, देवकौठे मध्ये नागरिकांशी संवाद
संगमनेर विजय कापसे दि २६ डिसेंबर २०२४– उत्तर नगर जिल्हा आणि दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे निळवंडे धरण व कालवे आपण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले. पुढील काळात वितारिकांचे काम पूर्ण करून सर्वांना हे पाणी देण्याचे नियोजन केले होते. यापुढेही हे सर्व काम आपणच करणार असून तालुक्याच्या विकासाची व चांगल्या राजकारणाची परंपरा आपल्याला कायम ठेवायची असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
देवकौठे, चिंचोलीगुरव नान्नज दुमाला येथील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मागील 40 वर्षाच्या कालावधीत तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्याचा आपण राज्यात नव्हे तर देशात गौरव वाढवला. जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्य पातळीवर काम करण्याची मोठी संधी मिळाली आणि याचा उपयोग तालुक्यातील प्रत्येक विकास कामांसाठी आपण केला. सर्वात महत्त्वाची निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण केली. लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीवरील पुनर्वासनाचा शेरा हटवला. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्श पॅटर्न आपण केला. कोरोना संकटातही कालव्यांचे काम सुरू ठेवले. अनेक भागात पाणी आले उर्वरित भागांमध्ये पाणी देण्यासाठी देशभरातील विविध योजनांचा अभ्यास करून कालव्यांच्या वरच्या भागात पाणी देण्यासाठीचे नियोजन आपण पूर्ण केले.
निवडणुकीमध्ये जय पराजय सुरूच असतो. मात्र जनतेने मोठे प्रेम केले. यापुढेही आपल्यालाही विकासाची वाटचाल कायम ठेवायची आहे.आपला तालुका, येथील राजकारण, येथील विकास, सहकार, शिक्षण, संस्कृती राज्याला दिशादर्शक आहे. ही टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.
काही मंडळींना हे पहावत नसल्याने ते उद्योग करतील .मात्र सर्वांनी आपसातील मतभेद विसरून आता तालुक्याच्या अस्मितेसाठी एकत्र यायचे आहे. गाव पातळीवरील आपल्या भांडणांमध्ये तालुक्याचे परिणामी आपल्या गावाचे आणि कुटुंबापर्यंतचे नुकसान होते. याची जाणीव यापूर्वी होत नव्हती आता सर्वांनी काळजी घ्यावी लागणार आहे.
मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही. आपण कायम जनतेसोबत असून यापुढील काळातही हीच चांगल्या विकासाची व राजकारणाची परंपरा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
या गावांच्या भेटीनंतर गावांमधून तरुणांनी व सर्वसामान्य नागरिकांनी आपण सदैव माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी असून ते आपल्या तालुक्याचे कुटुंबप्रमुख आहेत आणि त्यांनी कायम कुटुंबप्रमुख म्हणून काम करताना सर्वसामान्य साठीच काम केले असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. यावेळी प्रत्येक ठिकाणी नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.