पावसाने झालेल्या नूकसानीचा विचार करता स्थायी आदेशाच्या पलिकडे जावून मदत करण्याचा विचार करावा लागणार- पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
पावसाने झालेल्या नूकसानीचा विचार करता स्थायी आदेशाच्या पलिकडे जावून मदत करण्याचा विचार करावा लागणार- पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली

राहाता विजय कापसे दि ९ जुन २०२५– जिल्ह्यात मागील काही दिवसांत मोठ्या स्वरुपातील पावसाने झालेल्या नूकसानीचा विचार करता स्थायी आदेशाच्या पलिकडे जावून मदत करण्याचा विचार करावा लागणार असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाववाडी, अस्तगाव यथील काही भागांमध्ये चक्रीवादळ सदृष्य पावसाने डाळिंब, आंबा, ऊस आणि साठवलेल्या कांद्याचे तसेच घरांवर व गोठ्यांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाला पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देत अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. सरकार हे नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

झालेल्या नूकसानीचे सरसकट पंचनामे करा, महावितरणाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करावे अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी पाहाणीनंतर अधिकाऱ्यां समवेत घेतलेल्या बैठकीत दिल्या.

शनिवारी सायंकाळी बाभळेश्वर, राजुरी, ममदापूर, तिसगाव, अस्तगाव या भागामध्ये चक्री वादळाने या भागातील फळबागा तसेच शेती पीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. भाऊसाहेब विनायक म्हस्के यांची कांदा चाळ, डाळिंब उत्पादक राहुल सुरेश कसाब आणि डाळींबरत्न बी. टी. गोरे यांच्या डाळींब बागच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानी पाहणी ना.विखे पाटील यांनी केली. याप्रसंगी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांच्यासह वीज वितरण कंपनी, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकार आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. शासनाच्या वतीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी व मदत देण्यासाठी अडचणी आहेत या संदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी बोलून जास्तीतजास्त नुकसान भरपाई देण्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
वातावरणात झालेल्या बदलाने नैसर्गिक चक्र पूर्णपणे बदलले आहे. काही दिवसांपुर्वी पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने एका दिवसात धरणात एक टिएमसी पाणी आले असल्याने नैसर्गिक परीस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही.
वादळी वा-याने या भागातील वीज पुरवठा हा गेल्या दोन दिवसापासून बंद असून वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी युध्द पातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले. आपत्ती नैसर्गिक आपत्ती असली तरी,भविष्यात नुकसान कसे टाळता येऊ शकते यावरच उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येकाचा पंचनाम करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
