पावसाळ्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा- आ. आशुतोष काळेंचे आरोग्य विभागाला निर्देश

पावसाळ्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा- आ. आशुतोष काळेंचे आरोग्य विभागाला निर्देश
पावसाळ्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा- आ. आशुतोष काळेंचे आरोग्य विभागाला निर्देश

Kopargaon vijay kapse दि २८ जुलै २०२६– पावसाळ्यातील संभाव्य आजारांचा प्रसार वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी पुढे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज घेवून प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरात कुठेही डासांची पैदास होणार नाही याची दखल घेऊन आरोग्य विभागाने पावसाळयातील संभाव्य आजार टाळण्यासाठी तातडीने उपाय योजना करा असे निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

मंगळवार (दि.२८) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव एकात्म आरोग्य वर्धिनी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील रुग्णांपर्यंत पोहचवणे, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून रुग्णांना दर्जेदार सुविधा देणे, रुग्णालयातील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा तसेच रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांबाबत सविस्तर चर्चा झाली. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले असून पावसाळ्यातील संभाव्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने अलर्ट राहून यामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणीसाठी सर्व फवारणी मशीनची दुरुस्ती करून घ्यावी व तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहे.

यावेळी ते म्हणाले की, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यात आरोग्य विभागासाठी जितकी कामे मंजूर करून आणली तितकी कामे यापूर्वी कधीच झाली नव्हती. पूर्वी केवळ घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्ष कामे झाली नाहीत. सध्या कोपरगाव शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम वेगाने सुरू आहे. माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले आहे. याशिवाय संवत्सर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून संवत्सरचे प्राथमिक आरोग्य केंद्र कोकमठाण येथे स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात जातात. त्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्था अत्यंत सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात औषधे आणि लसीकरणासारख्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरूच राहणार असून आपण सर्व मिळून चारही बाजूने आरोग्य व्यवस्था बळकट करू. पावसाळ्यात डेंग्यूच्या डासांचे प्रमाण वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे.कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत, गट विकास अधिकारी स्वप्नील वाळूंज, संदीप दळवी,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. गिरीश गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप, सार्वजनिक बांधकाम अभियंता सीताराम दहीफळे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख आदींसह एकात्म आरोग्य वर्धिनी समितीचे सदस्य उपस्थित होते.




