इस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेचे कोपरगावात उत्साहात स्वागत; इस्कॉनमुळे युवा पिढीला संस्कारांची दिशा – आमदार विवेक कोल्हे

इस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेचे कोपरगावात उत्साहात स्वागत; इस्कॉनमुळे युवा पिढीला संस्कारांची दिशा – आमदार विवेक कोल्हे
इस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेचे कोपरगावात उत्साहात स्वागत; इस्कॉनमुळे युवा पिढीला संस्कारांची दिशा – आमदार विवेक कोल्हे

Kopargaon vijay kapse दि १९ जुलै २०२६: इस्कॉन कोपरगावच्या वतीने आयोजित भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेचे कोपरगाव शहरात भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी भगवान श्री जगन्नाथांचे दर्शन घेऊन रथयात्रेला शुभेच्छा दिल्या. तसेच इस्कॉन संस्थेच्या माध्यमातून समाजात सुरू असलेल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी बोलताना आमदार विवेक कोल्हे म्हणाले की, इस्कॉन ही संस्था केवळ धार्मिक कार्यापुरती मर्यादित नसून युवा पिढीला संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि अध्यात्माची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांना सकारात्मक विचार, व्यसनमुक्त जीवनशैली आणि भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे काम इस्कॉन प्रभावीपणे करत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

रथयात्रेच्या स्वागतासाठी कोपरगाव शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. स्वच्छ आणि सुंदर वातावरणात भगवान श्री जगन्नाथांच्या रथाचे भाविकांनी मोठ्या श्रद्धेने स्वागत केले. आमदार विवेक कोल्हे यांनीही मनोभावे दर्शन घेऊन सर्व नागरिकांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी इस्कॉनचे महंत, पदाधिकारी, नगराध्यक्ष पराग संधान, मच्छिंद्र केकान, विजयराव आढाव, राजेंद्र सोनवणे, प्रशांत कडू, विनोद राक्षे, बाळासाहेब नरोडे, प्रसाद आढाव, कैलास मंजुळ, संतोष चवंडके, स्वप्निल मंजुळ, सरपंच संदीप देवकर, डॉ. अमोल अजमेरे, संजय उदावंत, दत्तू पगारे, रोहित कनगरे, स्वराज सूर्यवंशी, अर्जुन माकोने, शैलेश नागरे, आयुब कच्छी यांच्यासह स्वयंसेवक, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिनाम संकीर्तन, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या रथयात्रेमुळे कोपरगाव शहर आध्यात्मिक उत्साहाने भारावून गेले. इस्कॉनच्या या उपक्रमामुळे समाजात अध्यात्म, सेवा आणि संस्कारांची प्रेरणा अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



