आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या वर्षी तालुकास्तरीय क्रिकेटवर वर्चस्व

एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या वर्षी तालुकास्तरीय क्रिकेटवर वर्चस्व

अंतिम सामन्यात आत्मा मालिक गुरुकुलवर ७ गडी राखून विजय; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार आगेकूच

Kopargaon vijay kapse दि २१ सप्टेंबर २०२६: जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर, तालुका क्रीडा समिती, कोपरगाव आणि एस.एस.जी.एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षांआतील तालुकास्तरीय शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावत तालुक्यातील क्रिकेट क्षेत्रात आपले वर्चस्व कायम राखले.

जाहिरात

दि. १९ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा रंगली. स्पर्धेत समता इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज, के. जे. सोमय्या कॉलेज, संजीवनी ज्युनिअर कॉलेज, सोमय्या विद्यामंदिर साकरवाडी, महर्षी संत जनार्दन स्वामी ज्युनिअर कॉलेज, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज, आत्मा मालिक सी.बी.एस.ई. ज्युनिअर कॉलेज, आत्मा मालिक उच्च माध्यमिक ज्युनिअर कॉलेज, कोकमठाण आणि एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगाव अशा एकूण नऊ संघांनी सहभाग घेतला.

जाहिरात

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी खेळाडूंना संघभावना, शिस्त आणि खिलाडूवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले.

दि. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात एस.एस.जी.एम. महाविद्यालय आणि आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण हे दोन तुल्यबळ संघ आमनेसामने आले. एस.एस.जी.एम.ने नाणेफेक जिंकून आत्मा मालिक संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. आत्मा मालिक संघाने निर्धारित ८ षटकांत ६ गडी गमावत ४५ धावा केल्या. विजयासाठी ४६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या एस.एस.जी.एम.च्या संघाने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ६.३ षटकांत ३ गडी गमावून ४६ धावांचे लक्ष्य पार केले आणि ७ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

जाहिरात

या विजयासह एस.एस.जी.एम. महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी १९ वर्षांआतील तालुकास्तरीय शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

बक्षीस वितरण समारंभास रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे उपस्थित होते. विजेत्या संघाचे अभिनंदन करताना त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेतही खेळाडूंनी अशीच चमकदार कामगिरी करावी, तसेच क्रीडाक्षेत्रासोबतच शैक्षणिक गुणवत्तेतही भरीव यश संपादन करावे, असे आवाहन केले.

ॲड. संदीप वर्पे यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सीनियर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य  रविंद्र हिंगे, पर्यवेक्षक  माधव रेवगडे, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष  नितीन निकम, शारीरिक शिक्षण शिक्षक  सुनील कदम, क्रिकेट मार्गदर्शक  संदीप शिंदे, सुनील चव्हाण, क्रिकेट समालोचक संतोष विधाटे, तसेच आत्मा मालिकचे  संदीप बोळीज व  प्रशांत शर्मा आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. माधव सरोदे तसेच महाविद्यालय विकास समितीच्या सदस्यांनी विजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे