संजीवनीच्या धनश्री, स्वस्तिका ऑक्सफर्डमध्ये संशोधन सादर करणार- अमित कोल्हे

संजीवनीच्या धनश्री, स्वस्तिका ऑक्सफर्डमध्ये संशोधन सादर करणार- अमित कोल्हे
जागतिक एआय परिषदेसाठी निवड; ‘रूरल टू ग्लोबल’ वाटचालीवर पुन्हा शिक्कामोर्तब
Kopargaon vijay kapse दि २ सप्टेंबर २०२६: संजीवनी विद्यापीठाच्या धनश्री सुनिल देवकर आणि स्वस्तिका कुलदीप जगताप या विद्यार्थिनींच्या ‘क्लॉड एआय लिटरसी’ या संशोधन पेपरची ऑक्सफर्ड विद्यापीठात होणाऱ्या ‘ग्लोबल एआय समिट २०२६’ या प्रतिष्ठित जागतिक परिषदेसाठी निवड झाली आहे. जगभरातील केवळ १६ संशोधकांना मिळालेल्या या संधीमध्ये या दोघींचा समावेश असून, त्या सर्वांत कमी वयाच्या संशोधक आहेत. त्यामुळे संजीवनी विद्यापीठाची ‘रूरल टू ग्लोबल’ वाटचाल पुन्हा अधोरेखित झाली आहे, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी व्यक्त केली.

संजीवनी विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधन व कौशल्य विकासासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांनी स्थापन केलेल्या ‘एर्डोस रिसर्च’ संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. संस्थेचे संस्थापक व ऑक्सफर्ड विद्यापीठातील एआय तज्ज्ञ प्रा. अजित जावकर यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री व स्वस्तिका यांनी हा संशोधन पेपर तयार केला.

या संशोधनात एआयच्या सहाय्याने शिक्षक-विद्यार्थी अध्यापन व अध्ययन अधिक प्रभावी कसे करता येईल, याचा अभ्यास करण्यात आला. संजीवनी इंटरनॅशनल स्कूल (शिर्डी) आणि संजीवनी अकॅडमी (कोपरगाव) येथे प्रत्यक्ष प्रयोग करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने शिकविलेल्या धड्यानंतर आणि ‘क्लॉड एआय लिटरसी’च्या पद्धतीने शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. एआयच्या सहाय्याने शिकविलेल्या पद्धतीत विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी धनश्री व स्वस्तिका यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी दोन्ही विद्यार्थिनी तसेच त्यांचे पालक सुनिल देवकर, श्रद्धा देवकर, कुलदीप जगताप व अश्विनी जगताप यांचा सत्कार केला. यावेळी व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकूर, डीन डॉ. कविथा राणी, डॉ. सरिता पवार व डॉ. देवयानी भामरे उपस्थित होते.

‘ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठाची संधी’
“ग्रामीण भागातील आमच्या मुलीला संजीवनी विद्यापीठाच्या जागतिक दर्जाच्या शिक्षण पद्धतीमुळे ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन सादर करण्याची संधी मिळाली. ही केवळ आमच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब नसून संजीवनीच्या उत्कृष्ट शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाधारित अध्यापन आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाची साक्ष आहे.”
— सुनिल देवकर, पालक
“आम्ही संवत्सरासारख्या ग्रामीण भागात राहतो. आमच्या मुलीच्या संशोधन पेपरची ऑक्सफर्ड विद्यापीठाने निवड केली, ही अभिमानाची बाब आहे. संजीवनी विद्यापीठामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांनाही जागतिक व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.”
— अश्विनी जगताप, पालक



