यू.आय.टी.एम. मारा युनिव्हर्सिटी व सोमैया महाविद्यालयाच्या कराराचे नूतनीकरण

यू.आय.टी.एम. मारा युनिव्हर्सिटी व सोमैया महाविद्यालयाच्या कराराचे नूतनीकरण
यू.आय.टी.एम. मारा युनिव्हर्सिटी व सोमैया महाविद्यालयाच्या कराराचे नूतनीकरण

कोपरगाव विजय कापसे दि ७ जानेवारी २०२६– मलेशियातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी मारा (यू.आय. टी .एम.) – केदाह कॅम्पस आणि के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव यांच्यातील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य अधिक व्यापक व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले. हा करार प्रथम २०२२ मध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला होता. दोन्ही संस्थांमधील यशस्वी व फलदायी सहकार्याचा अनुभव लक्षात घेता हा करार आता पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी वाढविण्यात आला आहे.

या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रम, विद्यार्थी व प्राध्यापक आदान-प्रदान कार्यक्रम, कार्यशाळा, व्याख्यानमाला तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. आतापर्यंत या करारांतर्गत अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक व संशोधनात्मक उपक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये WBW 1.0 व WBW 2.0 हे आंतरसंस्कृती कार्यक्रम, दोन आंतरराष्ट्रीय परिषदा, विविध कार्यशाळा, विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रम, लेक्चर सेरीज व गेस्ट लेक्चर्स यांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांना दोन्ही शैक्षणिक संस्थांमधील मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या यशामुळेच या सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात येत आहे.

या सामंजस्य कराराच्या नूतनीकरणप्रसंगी यू.आय. टी .एम. मारा युनिव्हर्सिटीच्या रेक्टर प्रा. रोशिमा सईद, डॉ. जुनेदा इस्माईल, के. जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, सामंजस्य कराराच्या समन्वयक मॅडम सियाझलियाती इब्राहिम, तसेच डॉ. रवींद्र जाधव आणि डॉ. शंकर कोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा करार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मधील शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरणासारख्या उद्दिष्टांना बळकटी देणारा असून, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक करारांशी संबंधित कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. के. जे. सोमैया महाविद्यालयाचे अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रम फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, कोलंबिया, ग्रीस, थायलंड, नेपाळ आदी देशांतील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सुरू असून, महाविद्यालयाची जागतिक पातळीवरील शैक्षणिक ओळख अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी केले.
दरम्यान, “Globally Renowned, Locally Rooted” या ध्येय-वाक्याशी सुसंगत असा हा करार असून, स्थानिक मूल्ये जपत जागतिक स्तरावर अर्थपूर्ण व दीर्घकालीन शैक्षणिक संबंध प्रस्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा या करारामुळे पूर्ण झाला आहे, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले.
यू.आय. टी .एम.केदाह, मलेशिया व के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव यांच्यातील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य कराराच्या नूतनीकरणप्रसंगी यू.आय. टी . एम.चे रेक्टर प्रा. रोशिमा सईद, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, समन्वयक मॅडम सियाझलियाती इब्राहिम तसेच डॉ. रवींद्र जाधव व डॉ. शंकर कोंडा.



