आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेरमध्ये नवीन ‘सेवा दवाखाने’ सुरू होणार
आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेरमध्ये नवीन ‘सेवा दवाखाने’ सुरू होणार
नागपूर कार्यालयाच्या क्षेत्रातील बंद दवाखाने संगमनेरमध्ये स्थलांतरीत होणार : आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश.
– महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठानच्या नव्या निर्णयाने १०,००० विमाधारकांना मिळणार आरोग्यसेवा.

संगमनेर विजय कापसे दि २२ जानेवारी २०२६– महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठान (महा-राकावि) च्या अंतर्गत वैद्यकीय प्रतिपूर्ति अधिकारी, नागपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील बंद करण्यात आलेले सेवा दवाखाने आता संगमनेर येथे स्थलांतरित करून पुन्हा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराला यश आले आहे.

महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठानच्या क्षेत्रीय कार्यालय, नाशिक यांनी ४ जून २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की संगमनेर येथे सुमारे १०,००० विमाधारक लाभार्थी असल्याची नोंद आहे. सदर भागातील या सर्व लाभार्थ्यांना आरोग्य सेवा सुलभ व तत्काळ उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र सेवा दवाखाने सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. या दवाखान्यामुळे विमाधारक व त्यांच्या कुटुंबीयांना स्थानिक पातळीवरच त्वरित व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याची पूर्वआवश्यकता पूर्ण होईल. सदर प्रस्तावास मान्यता देऊन संगमनेर येथील सेवा दवाखाने लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत.

यावेळी बोलताना तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरांमध्ये स्वतंत्र महिला हॉस्पिटल करता पाठपुरावा करण्यात आला आहे याचबरोबर “नागपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील बंद दवाखाने महाल व न्यू सेक्टर येथील ही वैद्यकीय सुविधा आमच्या क्षेत्रातील लोकांसाठी पुन्हा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारकडे सातत्याने आग्रह धरला होता. आमच्या या पाठपुरावाला आज यश मिळाले आहे. संगमनेर येथील हजारो विमाधारक कुटुंबांना आता आपल्या गावीच उत्तम वैद्यकीय सुविधा मिळतील. ही एक मोठी ऐपत लाभाची सोय ठरणार आहे.” त्यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय ‘संगमनेर २.०’ च्या संकल्पनेतून सुरू केलेल्या सर्वसमावेशक विकासाचाच एक भाग आहे.
या दवाखान्यांच्या सुरू होण्यामुळे स्थानिक रहिवाशांना दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही, अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे. विमाधारक लाभार्थ्यांना स्थानिक दवाखान्यांमध्येच औषधोपचार, तपासण्या व इतर आरोग्यसेवा मिळू शकतील, ज्यामुळे वेळ व पैसा दोन्ही वाचण्यास मदत होईल. आमदार तांबे यांच्या या प्रयत्नांमुळे संगमनेर परिसरातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वाची भर पडणार असून इतर नागरी सुविधांच्या विकासासाठीही एक सकारात्मक संदेश जाईल असे स्थानिक नागरिक मत व्यक्त करत आहेत.



