खाजगी शाळांच्या प्रश्नासंदर्भात संस्थाचालक व सरकारमध्ये योग्य समन्वय घडवून आणणार- पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

खाजगी शाळांच्या प्रश्नासंदर्भात संस्थाचालक व सरकारमध्ये योग्य समन्वय घडवून आणणार- पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
खाजगी शाळांच्या प्रश्नासंदर्भात संस्थाचालक व सरकारमध्ये योग्य समन्वय घडवून आणणार- पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी विजय कापसे दि ३१ जानेवारी २०२६–राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खासगी संस्थानाही आता पुढाकार घ्यावा लागेल. शालेय शिक्षणा बरोबरच मुल्य आणि कौशल्यपुर्ण शिक्षणातूनच संस्थाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. खाजFगी शाळांच्या प्रश्नासंदर्भात संस्था चालकांची संघटना आणि सरकारमध्ये योग्य समन्वय घडविण्यासाठी आपण निश्चित पुढाकार घेण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या संस्था चालकांच्या मेस्टा संघटनेचे ११ वे राज्यस्तरीय आधिवेशन आत्मामालिक ध्यानपीठात आयोजित करण्यात आले. आधिवेशनाचे उद्घाटन विश्वात्मक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष पं.पू परमानंद महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी मेस्टाचे अध्यक्ष डॉ.संजय तायडे, सरचिटणीस विनोद कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष केशव भवर, राज्य संघटक अनिल असलकर, अहिल्यानगरच्या अध्यक्षा सौ.सोनाली सालके यांच्यासह राज्यातून आलेले संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री स्व.अजीत पवार यांच्या निधनामुळे उद्घाटनाचा तसेच सत्कार सोहळ्याचा कोणताही डामडौल न करता साध्या पध्दतीने कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा या सक्षम झाल्या पाहीजेत. या संघटनेच्या मतांशी आपण सहमत आहोत. शिक्षण मंत्री असतानाही खासगी शाळांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका आपण घेतली होती. या शाळांमधूनही शिक्षणाचा दर्जा वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र तेवढ्या संघर्षालाही संस्था चालकांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाला ३५ वर्षांनंतर शैक्षणिक धोरणाचा मसुदा मिळाला. या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान संस्था समोर आहे. यापुर्वी १९६४ साली राज्यातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी काढली. परंतू इंग्रजी माध्यमाची शाळा काढताना त्यांना कराव्या लागणा-या संघर्षाची आठवण सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, काळाच्या ओघात आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे महत्व वाढले.
या शाळांमधील वाढत स्पर्धा आणि संस्था चालकांना आव्हानात्मक परिस्थितीत टिकवावी लागलेली गुणवत्ता पाहाता या शाळांच्या प्रश्नांबाबत अधिक गांभिर्याने निर्णय होणे गरजेचे आहे. असे स्पष्ट करुन, आपली संघटना आणि सरकार यांच्यामध्ये योग्यतो समन्वय घडविण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
खासगी शाळा असल्या तरी, बदलत्या सामाजिक व्यवस्थेत विद्यार्थ्यांना गुणात्मक आणि दर्जेदार शिक्षण देतानाच मुल्य शिक्षणाबाबतही आता गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आज संपूर्ण देशात कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. हेच कौशल्य शिक्षण शालेय जीवनापासूनच सुरु व्हावे म्हणूनही शाळांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी दिले. याप्रसंगी परमानंद महाराज तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय तायडे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेख कार्य करण-या संस्थाचा मंत्री विखे पाटील यांच्याहस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.



